"व्यवस्थापन ताण तणावाचे"
महिलांचे आयुष्य आणि ताण तणाव यांचं जणू अतूट नातच. कुटुंबातील गरजा व त्याची पूर्तता करण्याची कसरत ही केवळ आणि केवळ महिलांनाच शक्य होते. सारा ताणतणाव स्वीकारून व वेळप्रसंगी बाजूला ठेवून आपल्या कुटुंबाला परिस्थितीजन्य मार्गाचा उपयोग करून उत्कर्षाकडे नेण्याचे अभिनव कार्य महिला करीत असतात. त्यांची कुटुंब एक संघ व चैतन्यमय ठेवण्याचे कसब ही एक प्रकारे दैवी देणगीच होय. आज महिला सक्षम होत आहेत. कर्तुत्वाच्या बळावर त्या यशाची नवनवी शिखरे पादक्रांत करीत आहेत. तथापि, आज आणि उद्याही धारिष्टाने म्हणावे लागेल की, महिलांचा पेहराव बदलेल, त्याची विचारसरणी बदलेल, आर्थिक स्वातंत्र्याच्या त्या अधिकारी होतील. परंतु पुरुषाचा महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार नाही. आपल्या भारतीय संस्कृतीत स्त्रियांना आदराचे स्थान आहे. त्या संदर्भात संस्कृत वचन तर आपल्या सर्वांना परिचित आहे.
*'यत्र नार्यस्तु पुण्यते, तस्य रम्यते देवता '* महिलांच्या ताणतणावा सोबत आयुष्यात सर्व पातळयांवर नाती जपण्याचे आव्हान त्यांना स्वीकारावे लागते. घराततील स्वच्छते पासून लहान मोठ्यांच्या आरोग्याची जागरूकता व भविष्यातील संभावित अडीअडचणी सोडवण्याच्या दृष्टीने योग्य नियोजन करणे, याचे अलिखित अधिकार जणू महिलांना दिलेले असतात. प्रत्येकाच्या आवडीनिवडी जपणे, मोठ्या व्यक्तींच्या भावनांचा आदर करणे, पै पाहुण्यांची व्यवस्था करणे, हे सर्व करत असताना हा ठरलेलाच. पण त्यातून घरातील व्यक्तीचे सहकार्य मिळणे, प्रेम मिळणे व एक दुसऱ्याला समजून घेणे याही अपेक्षा करणे गरजेचे ठरते.
आर्थिक नियोजन करताना व प्रापंचिक गाज ढवळताना बऱ्याच महिलांची त्रेता निरपट होते. अशावेळी महिलांना मानसिक आधाराची गरज असते हे ओघाणेच आले. थोडीही काही चूक झाली की पुरुषी अहंकार जागा झालात समजा. अशा ताण तणावाच्या वेळी महिलांनी स्वतःला खंबीर बनणे महत्त्वाचे असते. दैनंदिनी जीवनातील ताणतणावाला यशस्वी संभाळला जाऊन कुठे वादाची, कलहाची ठिणगी पडणार नाही याची दक्षता घेत ती स्वतः संयमाच्या वेठीत स्वतःला अडकून घेते. ' ती आणि तिचे भावविश्व' हा अनोखा भावस्पर्शी विषय आहे. आई, बहीण, पत्नी, भाऊजाई, ननंद, सासू, सून अशा विविध भूमिका ती साकारत असताना तिची ताण तणावातून सुटका होईल असं कसं शक्य आहे. अर्थात हेही खरं आहे, कुटुंबाच्या आर्थिक, शैक्षणिक, आरोग्य विषयक गरजांची पूर्तता करण्याच्या जबाबदाऱ्यांच्या ओझाने तिच भाव विश्व कोमेजून जातं.
घरातील सर्व व्याप सांभाळून आपल्या कुटुंबाची पताका फडकवणाऱ्या स्त्रियांच्या कमी नाही. आज भारताची प्रथम महिला म्हणून महामहीम राष्ट्रपती दौपदी मुर्मू विराजमान आहेत. सुनीता विल्यम्स सारख्या महिला आकाशाला गवसणी घालायला निघाल्या आहेत. माँ जिजाऊ व सावित्रीबाई फुले सारख्या स्त्री रत्नांची प्रेरणा घेऊन कित्येक महिला विविध क्षेत्रात नेत्रदीपक प्रगती करीत आहेत. महिलांच्या वाट्याला ताण तणाव नाही असा कुठलाही दिवस उगवत नाही. तथापि तणाव निवारण्याचे व्यवस्थापन प्रत्येक महिलेने शिकणे व अमलात आणणे गरजेचे आहे. जेणेकरून ताण तणाव, शारीरिक मानसिक कष्टाचा आपल्या कुटुंबावर परिणाम होणार नाही. त्यासाठी प्रत्येक महिलेने सकाळची सुरुवात योग अभ्यासाने करावी यामुळे दिवसभर स्फूर्ती व उत्साह कायम राहील.
त्याचप्रमाणे जसा वेळ उपलब्ध होईल, वाचन करणे गरजेचे आहे. प्रेरणादायी पुस्तकांचा आपल्या वाचनात समावेश केल्याने दिवसभरांमध्ये कंटाळा वाटणार नाही. आपण आपले छंद जोपासले पाहिजे. आपल्या छंदातून आपण दुसऱ्यांना आनंद देऊ शकतो का याचा विचार करावा. गरजूंना आपल्या क्षमतेने मदत केली तर मनावरचा ताण नाहीसा होतो असा बहुतेकांचा अनुभव आहे. ताण तणाव रहित आयुष्य हे प्रगतीचे लक्षण आहे निळनिरळ्या संस्कृतीक कार्यक्रमांना हजेरी लावणं हा ताण तणाव घालवण्याचा सर्वोत्तम उपाय होईल . अशा प्रकारे प्रत्येक महिलेने ताणतणावरहित आयुष्य जगून आपल्या कुटुंबाला सक्षम करावं व राष्ट्रनिर्मितीत महत्त्वाचे योगदान द्यावे .
सौ. मंदाकिनी राजशेखर जाबा
शिवशंकर कॉलनी, छत्रपती संभाजीनगर.