सोलापूर :- सोलापूर शहरात बुधवार दिनांक 10 सप्टेंबर 2025 रोजी मध्यरात्री अतिवृष्टी झाली, त्यामुळे सोलापूर शहरातील अनेक भागात पाणी साचले. अक्कलकोट रोडवरील सादुल पेट्रोल पंपा समोरील राष्ट्रीय महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली पाणी निचरा होणारी कमी व्यासाची पाईपलाईन असल्याने त्या भागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचून नागरिकांच्या घरामध्ये पाणी शिरले व त्यातून नागरिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले आहे. तरी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी या बाबीची गंभीर दखल घेऊन जिल्हाधिकारी व मनपा आयुक्त यांच्या समवेत चर्चा करून यातून तात्काळ मार्ग काढावा, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.
शासकीय विश्रामगृह येथील सभागृहात आयोजित सर्व विभागाच्या आढावा बैठकीत पालकमंत्री जयकुमार गोरे बोलत होते. यावेळी आमदार देवेंद्र कोठे, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मनपा आयुक्त सचिन ओंबासे, सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम. राजकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सुनील कुंभार, कार्यकारी अभियंता मनोज ठाकरे, अमित निमकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुहास माने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास नवले यांच्यासह अन्य संबंधित यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री श्री. गोरे पुढे म्हणाले की, राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी सोलापूर शहरातून जाणाऱ्या सर्व महामार्ग च्या अनुषंगाने पाहणी करावी व पावसाचे पाणी महामार्गामुळे कोठेही अडणार नाही याबाबत खबरदारी घ्यावी. तसेच जिल्हाधिकारी यांनी महापालिका आयुक्त व राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून उड्डाण पुलाच्या खालील पुलातून पाण्याचा निचरा प्रणाली व्यवस्थित करणे व भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी उपाययोजना सुचवाव्यात. या भागात पाणी साचल्यामुळे झालेल्या नुकसानीला राष्ट्रीय महामार्गच जबाबदार असल्याने याची गंभीर दखल घ्यावी, असेही त्यांनी निर्देशित केले आहे.
जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत येणाऱ्या विविध विभागाचा आढावा
जिल्हा वार्षिक योजना सन 2025- 26 सर्वसाधारण अंतर्गत विविध शासकीय विभागाने त्यांना मंजूर करण्यात आलेल्या निधी अंतर्गत चे विकासात्मक कामांचा आढावा पालकमंत्री श्री गोरे यांनी घेतला. यामध्ये वन विभाग, सार्वजनिक बांधकाम, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक, राष्ट्रीय महामार्ग, जिल्हा परिषद, नगरपालिका, सोलापूर महापालिका, महाराष्ट्र राज्य वीज वितरण विभाग, कृषी विभाग या विभागांचा सविस्तर आढावा घेऊन संबंधित विभाग प्रमुख यांनी तात्काळ प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव नियोजन समितीला सादर करण्याबाबत त्यांनी निर्देश दिले.
शहरात अतिवृष्टीने पाणी साचलेल्या भागाची तसेच स्वच्छतेची पाहणी
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सोलापूर शहरात बुधवारी रात्री अतिवृष्टी झाली त्यामुळे शहराच्या विविध भागात पाणी साचून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरले तसेच शहराच्या विविध भागात स्वच्छतेची पाहणी केली व अतिवृष्टीने बाधित झालेल्या नागरिकांशी संवाद साधून त्यांना दिलासा दिला. अक्कलकोट रोडवरील एमआयडीसी मधील वज्रेश्वर नगर, नीलम नगर व नवले नगर भागात अतीवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. तसेच सादुल पेट्रोल पंपा समोरील उड्डाण पुलाच्या खालील पुलाखालून पाणी न गेल्याने झालेल्या भागाची पाहणी त्यांनी केली.
सोलापूर शहरातील स्वच्छतेच्या अनुषंगाने मोदी, जगजीवन राम झोपडपट्टी, नळ बाजार, लष्कर, लोधी गल्ली, आडके हॉस्पिटल, पाथरूड चौक, बापूजी नगर, लोकमंगल हॉस्पिटल या भागाची पाहणी केली. येथील नागरिकांशी संवाद साधला. या भागासह सोलापूर शहराच्या स्वच्छतेबाबत तात्काळ महापालिकेने कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री गोरे यांनी दिले.
