यवतमाळ : मोरारी बापू यांच्या वाणीतून रामकथा ऐकण्याची संधी आपणा सर्वांना प्राप्त झालेले आहे. पिढ्यानपिढ्या आपण राम कथा ऐकत आलेलो आहोत, मात्र मोरारी बापू यांच्या वाणीतून राम कथा ऐकणे, हे सहस्त्रनाम ऐकण्याचे सौभाग्य आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.चिंतामणी कृषी उत्पन्न बाजार समिती येथे मोरारी बापू यांच्या राम कथा प्रवचनाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री संजय राठोड, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार संजय देशमुख, बळवंत वानखेडे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, किशोर जोरगेवार, राजू तोडसाम, ॲड आशिष देशमुख, किसनराव वानखेडे, सईताई डहाके, रामकथाचे आयोजक डॉ. विजय दर्डा, राजेंद्र दर्डा आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले, राम कथा ही सर्वात सुंदर कथा आहे. त्यामुळे ही राम कथा ऐकणे म्हणजे जीवनाचा मार्ग प्रशस्त करणे आहे. राम कथेमध्ये संपूर्ण जीवनाची सुंदर शिकवण आहे. मोरारी बापू यांच्याकडून अर्थपूर्ण राम कथा ऐकायला मिळणे हे प्रत्येकासाठी सौभाग्याचा क्षण आहे. प्रभू रामचंद्राचे जीवन हे मर्यादेचे पालन करणारे आहे. त्यामुळे ते सर्वोत्तम मर्यादा पुरुष ठरले आहेत. राम कथा ही त्याग, तप, तेज, अनुशासन आणि भावनांचा संगम आहे. आज पाचशे वर्षानंतर प्रभू राम अयोध्येत त्यांच्या हक्काच्या ठिकाणी विराजमान झाले आहेत. ही प्रत्येक भारतीयाला गौरव वाटणारी बाब आहे.
जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनावर आधारित पुस्तक ‘पेन अँड पर्पज’ त्यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारे आहे. यातून त्यांचे स्वातंत्र्यसंग्रामामधील योगदान, तसेच प्रगत महाराष्ट्राचे चित्र दिसून येते. या पुस्तकातून जवाहरलाल दर्डा यांच्या राज्याच्या प्रगतीसाठी दिलेल्या योगदानासह त्यांच्या जीवनचरित्राचे पैलूही समोर आले आहे. जवाहरलाल दर्डा यांनी संस्कृती, उद्योग यासह सर्वच क्षेत्राला दिशा देण्याचे काम केले. बाबूजींच्या पश्चात डॉ. विजय दर्डा यांच्या सामाजिक कामातून समाजाला प्रेरणा मिळत आहे. डॉ. दर्डा यांच्यामुळे मोरारी बापू यांच्या दर्शनाचा लाभ मिळाला, असल्याचे सांगितले.
रामकथा कार्यक्रमस्थळी आगमन झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी मोरारी बापू यांचे शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. त्यानंतर डॉ. विजय दर्डा आणि राजेंद्र दर्डा यांनी मुख्यमंत्री यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री यांच्या हस्ते जवाहरलाल दर्डा यांच्या जीवनावर आधारित ‘पेन ॲण्ड पर्पज’ पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच मुख्यमंत्री यांच्याहस्ते जवाहरलाल दर्डा यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त प्रकाशित शंभर रुपयांचे नाणे मोरारी बापू यांना समर्पित करण्यात आले.
