सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • बंजारा समाजाला ST प्रवर्गातून आरक्षण द्या, तोपर्यंत लढाई थांबणार नाही; बीडमधून धनंजय मुंडे यांची मागणी
  • खडकवासला धरणातून पाणी सोडलं, भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता, पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर
  • मुंबईकरांनो सावधान, पुढील तीन तास जपून, अतिवृष्टीची शक्यता, हवामान खात्याचा अलर्ट
  • मुंबई, ठाणे, रायगडसाठी पुढील तीन तास महत्त्वाचे, पाऊस अन् वाऱ्याचा वेग वाढणार, हवामान खात्याचा अलर्ट
 शहर

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

डिजिटल पुणे    15-09-2025 11:09:48

पुणे : देशातील उच्च व तंत्रशिक्षण देणाऱ्या संस्थांना नव संशोधन आणि सक्षम मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी स्वायतत्ता देणे ही काळाची गरज असून त्यादृष्टीने केंद्र व राज्य पातळीवर शासनातर्फे प्रयत्न सुरू असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठात ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकीच्या नूतन इमारतीचे उद्घाटन व अभियांत्रिकी दिनानिमित्त आयोजित ‘सीओईपी अभिमान पुरस्कार’ सोहळ्याप्रसंगी मुख्यमंत्री श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू सुनील भरुड, कुलसचिव डॉ. दयाराम सोनवणे, माजी संचालक शैलेश सहस्त्रबुद्धे, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते, सचिव सुजीत परदेशी आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, स्वायतत्ता मिळाल्यामुळे सीओईपीसारख्या संस्था जागतिक स्तरावर भागीदारी करू शकतील, तंत्रज्ञान देवाण-घेवाण व सहयोगी संशोधन करू शकतील. यामुळे महाराष्ट्राची ३ ट्रिलियन आणि भारताची ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करताना सक्षम मानव संसाधनाचा सेतू उभा राहील. आगामी काळात अधिकाधिक संस्थांना स्वायतत्ता देण्याचा राज्य शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे,असे मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी स्पष्ट केले.ते म्हणाले, सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठाच्या विस्तारासाठी चिखली येथे २८ एकर जागा दिली आहे. अशा संस्थांना अधिक सक्षम करण्यासाठी शासन स्तरावरून मदत केली जाईल. तसेच संशोधन उभारण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल. भारतातील प्रतिष्ठित आणि ज्येष्ठ संस्था म्हणून सीओईपीकडे बघितले जाते. या संस्थेला १७२ वर्षांचा इतिहास असून २०२८ मध्ये संस्थेला १७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. हा भारताच्या शैक्षणिक इतिहासातील विलक्षण प्रवास आहे. सीओईपीमधून शिक्षण घेऊन आज विविध क्षेत्रात माजी विद्यार्थी कार्यरत असून समाजातील सर्व क्षेत्रांना समृद्ध करण्याचे कार्य ते करत आहेत.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले, १९९० च्या संगणकीकरणाच्या काळात अनेक शंका-कुशंका निर्माण झाल्या होत्या, मात्र हळूहळू मानव संसाधनाची निर्मिती होत गेली, भारतीय तरुणांनी सिलीकॉन व्हॅली व्यापली. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात आपली क्षमता दाखवून दिल्यामुळे भारताकडे जागतिक पातळीवर बघण्याचा दृष्टीकोन बदलला. त्याचे सर्व श्रेय अभियंत्यांनाच जाते. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि कम्प्युटिंगमुळे आज जगात वेगाने बदल होत आहेत. या बदलांसोबतच नवनवीन संधी निर्माण होत असून हॅकेथॉनसारख्या उपक्रमांतून त्याची झलक दिसते. पुण्यातील कृषी हॅकेथॉनमध्ये बदलत्या हवामानामुळे उद्भवणाऱ्या नव्या किडींवर मात करण्यासाठी एआयच्या साहाय्याने अंदाज दर्शविणारे मॉडेल विकसित झाले असून हे निश्चितच आशादायक आहे.

तांत्रिक संस्था व अभियांत्रिकी महाविद्यालयांनी बदलत्या तंत्रज्ञानानुसार मानव संसाधन तयार करण्यासाठी पुढाकार घ्यावा. नवीन शैक्षणिक धोरण पारंपरिक विषयांना आधुनिकतेसह नव्या संधी उपलब्ध करून देत असल्याने तरुणाई हा बदल स्वीकारेल अशी आशाही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील नवीन शैक्षणिक धोरणात भारतीय ज्ञानपरंपरेचा समावेश झाला आहे. यामध्ये संशोधन, पेटंट व रॉयल्टी यावर भर देण्यात आला आहे. २०४७ मध्ये विकसित भारतामध्ये या बाबींचे योगदान महत्त्वाचे राहील. सीओईपीसारख्या संस्थांचे बळकटीकरण करण्यास शासन सहकार्य करेल.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते जीवन गौरव व सीओईपी गौरव पुरस्कार वितरण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते यंदाचा जीवन गौरव पुरस्कार ए.आर.डी.ई.च्या माजी शास्त्रज्ञ श्रीमती वसंथा रामास्वामी यांना देण्यात आला. सीओईपी अभिमान पुरस्कार विलास जावडेकर डेव्हलपर्स, पुणेचे संस्थापक व अध्यक्ष विलास जावडेकर, एएसएमईचे माजी अध्यक्ष डॉ. महांतश हिरेमठ,  स्ट्रडकॉम कन्सल्टंट्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक जयंत इनामदार, जेएनपीएचे अध्यक्ष उमेश वाघ , इलेक्ट्रोमेक मटेरियल हँडलिंग सिस्टीम्स प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक तुषार मेहेंदळे  आणि महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्रवण हार्डीकर  यांना प्रदान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष भरत गीते यांनी केले. कुलगुरू सुनील भरुड यांनी विद्यापीठाची माहिती दिली.

ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठातील नव्याने बांधलेल्या ग्रंथालय व संगणक अभियांत्रिकी विभागाच्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले.१५० वर्षांचा अभिमानास्पद वारसा असलेले केंद्रीय ग्रंथालय आता आधुनिक, विशेष उद्देशाने उभारलेल्या इमारतीत स्थलांतरित झाले आहे. हे ग्रंथालय ४ हजारपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या ज्ञानार्जनाची गरज भागवेल. येथे गेल्या शतकातील मौल्यवान साहित्य, संदर्भग्रंथांचे जतन, आधुनिक डिजिटल साधने, सहयोगी अध्ययन व संशोधनासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.नवीन संगणक अभियांत्रिकी विभाग अत्याधुनिक प्रयोगशाळा व पायाभूत सुविधांनी सुसज्ज असून नाविन्यपूर्ण संशोधन आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानातील नवकल्पनांचे केंद्र ठरणार आहे.


 Give Feedback



 जाहिराती