नंदुरबार :नंदुरबार जिल्ह्यातील दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील आरोग्य सेवा आणि तेथील आरोग्याच्या समस्या नेहमीच देश-राज्यस्तरावर चर्चेचा विषय असतात. या सर्व पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी थेट सरदार सरोवरातील नर्मदा काठांवर दिल्या जाणाऱ्या बोट ॲम्ब्युलन्सला भेट देऊन, दुर्गम-अतिदुर्गम भागातील आदिवासी रुग्णांशी व नागरिकांशी संवाद साधला आणि येथील आरोग्य सेवेला एक नवसंजीवनीच दिली. एवढेच नव्हे तर थेट नर्मदा काठावरील बोट ॲम्ब्युलन्सची पाहणी करणारे ते पहिले आरोग्य मंत्री ठरले आहेत. त्यामुळे तेथील नागरिकांमध्ये चैतन्य संचारले होते.
आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दोन दिवसांचा नंदुरबार जिल्हा दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी धडगाव, अक्कलकुवा व तळोदा तालुक्यातील दुर्गम-अतिदुर्गम वाड्यापाड्यांमधील आरोग्य केंद्रे व रुग्णालयांना भेटी दिल्या. यात तेथील सेवा-सुविधांचा आढावा घेऊन आवश्यक सुधारणांबाबत सूचना केल्या तसेच दुर्गम भागातील आरोग्य सेवेत कार्यरत वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुकही केले.
जिथे रस्त्याने जाणेही कठीण आहे अशा सरदार सरोवर क्षेत्रातील नर्मदा काठावरील भुषा पॉइंट येथील बोट ॲम्ब्युलन्स/तरंगत्या दवाखान्याला त्यांनी आमदार आमश्या पाडवी व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांसह थेट पायवाटेने प्रवास करून भेट दिली.
केवळ तरंगत्या दवाखान्यालाच भेट न देता, खरोखरच रुग्णसेवा होते की नाही हे जाणून घेण्यासाठी त्यांनी भुषा पॉइंटच्या पलीकडील उकईपाडा येथे तरंगत्या दवाखान्यातून अचानक भेट दिली. या भेटीत त्यांनी नागरिकांकडून प्रत्यक्ष विचारपूस केली. “दिलेल्या वेळापत्रकानुसार तरंगता दवाखाना आमच्या पाड्यावर येतो. आमच्यावर चांगले वैद्यकीय उपचार या माध्यमातून होत आहेत,” असे नागरिकांनी मंत्री श्री. आबिटकर यांना सांगितले.
बोट ॲम्ब्युलन्सच्या आरोग्य सेवेबाबत समाधान – आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर
यावेळी बोलताना आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “आज नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सेवांच्या सुधारणांसाठी प्रत्यक्ष जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेची व त्या माध्यमातून दिल्या जाणाऱ्या सेवा-सुविधांची पाहणी केली. तसेच नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. सरदार सरोवर क्षेत्रातील दुर्गम भुषा पॉइंट व उकईपाडा येथे सुमारे ४ हजार लोकांना बोट ॲम्ब्युलन्स व तरंगत्या दवाखान्यातून अत्यंत दर्जेदार आरोग्य सेवा दिल्या जात आहेत, याबाबत खूपच समाधान वाटते. येथील आरोग्य सेवेचे अधिकारी व कर्मचारी अत्यंत दक्ष आहेत. त्यामुळे ते नक्कीच कौतुकास पात्र आहेत. येणाऱ्या काळात ही सेवा अधिक बळकट व विस्तारित करण्याचा आरोग्य विभागाचा मानस आहे.”
या वेळी आमदार आमश्या पाडवी, आरोग्य उपसंचालक (नाशिक विभाग) डॉ. कपील आहेर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रविंद्र सोनवणे यांच्यासह ग्रामीण रुग्णालयांचे तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रांचे वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते.