सेवाभावाची साक्ष; दिव्यांगांना मिळाला आधार
- दिव्यांग सहायता अभियानात १२०० हून अधिक दिव्यांगांना १७५० कृत्रिम साहित्यांचे वाटप
- पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांचे आयोजन
पुणे (प्रतिनिधी)
'सेवा हाच संकल्प', या ब्रीदवाक्याला प्रत्यक्षात उतरवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने १२०० हून अधिक दिव्यांगांना १७५० पेक्षा अधिक कृत्रिम अवयव आणि सहाय्यक साहित्यांचे वितरण करण्यात आले. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित 'सेवा पंधरवडा' अंतर्गत हा हृदयस्पर्शी उपक्रम केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या माध्यमातून राबविण्यात आला.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या पुढाकाराने व त्यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले. स.प. महाविद्यालयाच्या मैदानात झालेल्या या विधायक आणि भव्य उपक्रमात दिव्यांग बांधवांसाठी विविध प्रकारचे सहाय्यक उपकरणे, कृत्रिम अवयव, कानांचे यंत्र, चालण्यासाठी सहाय्य करणारी उपकरणे, इलेक्ट्रिक व्हीलचेअर्स आणि विशेषतः अंधांसाठी स्मार्ट फोन यांसारख्या वस्तूंचे वाटप करण्यात आले. या शिबिरात दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद आणि आत्मविश्वास, याच शिबिराच्या यशाची साक्ष देत होता.

या कार्यक्रमाला माजी केंद्रीय मंत्री श्री. प्रकाश जावडेकर, आमदार हेमंत रासने, पुणे महापालिका आयुक्त नवल किशोर राम, विमानतळ प्राधिकरणाचे वाय के गुप्ता, संतोष ढोके, एअरपोर्टचे सरबजीत सिंग, भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे, कर्णबधीर भाषा दुभाषी माधुरी गाडेकर, अमोल शिंगारे यांच्यासह शेकडो दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्य वितरण सुलभ व्हावे यासाठी विशेष म्हणजे लाभार्थ्यांची पूर्वनोंदणी, उपकरणांची मोजमापानुसार निवड, तांत्रिक चाचण्या आदी सर्व प्रक्रिया पार पाडण्यात आली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टीकडून दरवर्षी “सेवा पंधरवडा” राबवला जातो. या काळात विविध ठिकाणी सामाजिक, आरोग्य, स्वच्छता व सेवा उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच परंपरेतून, या वर्षीही दिव्यांगांसाठीचे सहाय्यता शिबिर हे सेवाभावाचा उत्कट प्रत्यय देणारे ठरले.
केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले, 'पंतप्रधान मोदी हे केवळ भारताचे नेतृत्व करत नाहीत, तर ते सेवाभावाचे प्रतीक आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीत “सत्ता ही सेवेची संधी आहे” हा दृष्टिकोन सातत्याने दिसतो. आजच्या या शिबिरातूनही त्याच मूल्यांची प्रचिती आली. दिव्यांग बांधवांना केवळ सहाय्यक साधनेच नव्हे, तर सन्मान, आत्मविश्वास आणि जगण्याची नवी उमेद मिळाली.
‘सलग तीन वर्षांपासून दिव्यांग बांधवांसाठी हे कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. भारतीय विमानतळ प्राधिकरणाच्या सीएसआर निधीतून हा उपक्रम राबवण्यात आला, हा निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल प्राधिकरणाचे आभार मानतो. पंतप्रधानांना शुभेच्छा देण्यासाठी ७५ हजार पुण्यातील विद्यार्थी पत्रे लिहिणार आहेत. दिव्यांग बांधवांच्या शुभेच्छांमुळे पंतप्रधानांना आणखी जोमाने काम करण्यासाठी बळ मिळेल,” असे ते म्हणाले.
प्रकाश जावडेकर म्हणाले, “पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात लाखो कार्यक्रम होत आहेत. मात्र हा कार्यक्रम विशेष आहे. असे चांगले उपक्रम राबवण्यासाठी नियोजन आवश्यक असते. पंतप्रधान मोदींनी ‘अपंग’ हा शब्द न वापरता ‘दिव्यांग’ असा सन्मानपूर्वक उल्लेख केला आहे. सर्व दिव्यांग बांधवांना न्याय देणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.”
पुणे महापालिका आयुक्त म्हणाले, “केंद्र, राज्य आणि स्थानिक स्तरांवर दिव्यांग बांधवांसाठी चांगले उपक्रम सुरू आहेत. या कार्यात खाजगी संस्थांनीही सक्रिय सहभाग घ्यावा, ही अपेक्षा आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षल दारकुंडे यांनी केले.