राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये संचारला नवा जोश . शरद पवारांच्या उपस्थितीत कार्यकारिणीची विक्रमी ५० वी मासिक बैठक
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांच्या उपस्थितीत पक्षाच्या पुणे शहर कार्यकारिणीची विक्रमी ५० वी बैठक व कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. महात्मा ज्योतिबा फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथे झालेल्या या कार्यकर्ता मेळाव्याने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा जोश संचारला आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते अंकुश काकडे यांनी आलेल्या सर्वांचे स्वागत केले. त्यानंतर शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी प्रास्ताविक सादर करत शरद पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी तयार असल्याची ग्वाही दिली. गेल्या साडेचार वर्षांत पक्षाने केलेली दमदार वाटचाल, पुणेकरांच्या हितासाठी पक्षाच्या वतीने करण्यात आलेली शेकडो आंदोलने, पक्षातील सर्व कार्यकर्त्यांनी दिलेले योगदान, पक्षात असलेली पारदर्शकता, प्रत्येक महिन्याला होणारी मासिक आढावा बैठक इत्यादी बाबींचा आढावा सादर केला. यावेळी प्रत्येक संघर्षात खंबीर साथ देणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांचे, पाठबळ देणाऱ्या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या प्रशांत जगताप यांनी आभार व्यक्त केले. आमदार बापूसाहेब पठारे, माजी आमदार जयदेवराव गायकवाड, गणेश नलावडे, उदय महाले, स्वाती पोकळे, किशोर कांबळे यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत सादर केले.

शरद पवार यांनी अध्यक्षीय भाषण करत उपस्थित सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपस्थित असलेल्या हजारो कार्यकर्त्यांची संख्या पाहता शहरातील वातावरण राष्ट्रवादीमय होतंय हा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. माननीय सर्वोच्च न्यायालयाने ३१ जानेवारीपूर्वी महानगरपालिकेच्या निवडणुकीची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत, या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागण्याच्या सूचना त्यांनी केल्या. आपला पक्ष गांधी, नेहरू, आझाद यांचा विचार मानणारा पक्ष आहे, हाच विचार घेऊन आपल्याला निवडणुकीला सामोरे जायचे आहे. निवडणुकीतील इतर पक्षांसोबत संभाव्य आघाडीचा निर्णय प्रदेश पातळीवर घेतला जाईल व निर्णय घेताना शहरातील कार्यकर्त्यांना विश्वासात घेतले जाईल. पुणे शहर सध्या असंख्य अडचणींचा सामना करत आहे. दळणवळणाचा प्रश्न, ट्रॅफिकचा प्रश्न, पाण्याचा प्रश्न, आरोग्य सुविधांचा प्रश्न असे असंख्य प्रश्न पुणेकर नागरिकांना भेडसावत आहेत. पुणेकरांना या अडचणीतून सोडवण्यासाठी आपल्याला विकासाचा दृष्टिकोन असणारे नगरसेवक निवडून आणावे लागतील. प्रशांत जगताप, अंकुश काकडे, कमलनानी ढोले पाटील हे स्वतः महापौर होते, त्यांच्या अनुभवाचा फायदा या शहराला झाला पाहिजे याची काळजी सर्व कार्यकर्त्यांनी घ्यावी. उद्याची महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाला उभारी देणारा ठरेल हा सर्वांनी निर्धार करावा असे आवाहन शरद पवारांनी केले.
यावेळी माजी आमदार कुमारभाऊ गोसावी, माजी आमदार कमलनानी ढोले पाटील, माजी शहराध्यक्ष रवींद्र माळवदकर, प्रकाशआप्पा म्हस्के, माजी आमदार अशोकबापू पवार, निलेश निकम, मंजिरी घाटगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे हजारो कार्यकर्ते उपस्थित होते.