अहिल्यानगर – अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या कर्जत तालुक्यातील नागलवाडी, नागपूर, सितपूर, निंबोडी, तरडगाव, मलठण व जामखेड तालुक्यातील चौंडी या गावांना विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी आज प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचा सविस्तर आढावा घेतला. ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
मुसळधार पावसामुळे शेती, चारा, जनावरांचे गोठे, रस्ते, पूल, बंधारे व पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणावर बाधित झाल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांवर व घरांवरील छप्पर उडून गेल्यामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण तसेच ग्रामस्थांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. चौंडी येथील शिल्पसृष्टीच्या बुरुजाला पाणी लागले असून चौंडी पुलावर ७ ते ८ फूट पाणी आल्याचेही या पाहणीत निदर्शनास आले.
या पार्श्वभूमीवर महसूल, कृषी व जलसंधारण विभागाच्या अधिकाऱ्यांना दोन दिवसांत पंचनामे करून अहवाल जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत शासनाकडे सादर करण्याचे निर्देश सभापतींनी दिले. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, प्रभावित कुटुंबांना अन्न, पाणी व वैद्यकीय मदत उपलब्ध व्हावी तसेच पायाभूत सुविधांची दुरुस्ती व पुनर्बांधणी तातडीने सुरू करावी, असे निर्देशही त्यांनी दिले.
ग्रामस्थांना संवाद साधताना प्रा. शिंदे म्हणाले, ही आपत्ती ग्रामस्थांना एकट्याने लढायची नाही. शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून एकही शेतकरी वा ग्रामस्थ मदतीपासून वंचित राहणार नाही. शासनस्तरावर आवश्यक ती मदत मिळविण्यासाठी मी स्वतः पाठपुरावा करणार आहे. ग्रामस्थांनी संयम राखावा, एकमेकांना सहकार्य करावे व प्रशासनाशी समन्वय ठेवून परिस्थितीचा सामना करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विजय मुळीक, उपविभागीय अधिकारी नितीन पाटील यांच्यासह महसूल, कृषी, वन व जलसंधारण विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. तसेच कर्जत व जामखेड तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.