मुंबई : राज्यातील आरोग्य यंत्रणा बळकटीकरणास शासनाचे प्राधान्य दिले असून ग्रामीण, दुर्गम भागातही दर्जेदार आवश्यक आरोग्य सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. या दृष्टीने आठवडाभरात नंदुरबार जिल्ह्यातील आरोग्य सुविधांचा अभ्यास दौरा करून संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांना त्याचा अहवाल सादर करावा, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले.
मंत्रालयात राज्य आरोग्य यंत्रणा संसाधन केंद्र (SHSRC) सोबत आयोजित बैठकीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी संबंधितांना सूचित केले. बैठकीस सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग तसेच संबंधित यंत्रणांचे प्रमुख उपस्थित होते.यावेळी मंत्री आबिटकर यांनी नंदुरबार येथील सिकलसेल अनेमिया, थैलेसिमीया व कंजानायटल अनॉमोली बाबत टास्क फोर्स तयार करण्याचे निर्देश देऊन टास्क फोर्सने आठवडा भरात नंदुरबार जिल्ह्याचा अभ्यास दौरा करून, त्याचा अहवाल तत्काळ सादर करण्याचे सूचित केले.तसेच नंदुरबार जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयात, आवश्यक प्रमाणात रक्त पुरवठा उपलब्ध करून देण्याचे सूचित करुन मंत्री आबिटकर यांनी सांगितले की, नंदुरबार जिल्हा आरोग्य सुविधांबाबत परिपूर्ण करावा. राज्यात दिशादर्शक ठरेल असे काम नंदुरबार जिल्ह्यात करायचे आहे.आरोग्य यंत्रणांनी स्वच्छतेसह गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची कटाक्षाने काळजी घ्यावी.
नंदुरबार जिल्ह्यात रक्त साठवण सुविधा उपलब्ध करून द्यावी. यंत्रणा प्रमुखांनी दुर्गम, ग्रामीण भागातील आरोग्य सुविधावर खबरदारी पूर्वक नियंत्रण ठेवावे, गरजूंना चांगल्या दर्जाचे औषध तसेच उपचार सुविधा द्याव्यात. इनहाऊस लॅब सक्षमीकरणावर विशेष लक्ष द्यावे. तसेच या भागातील कुपोषण सिकलसेलवर भरीव उपाय योजना राबविण्यात याव्यात. या सर्व कामांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रभावी नियंत्रण ठेवावे, असे मंत्री आबिटकर यांनी संबंधितांना सूचित केले.