पुणे : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या बाबुरावजी घोलप महाविद्यालय सांगवी येथील मराठी विभाग व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र - कुलगुरू डॉ. पराग काळकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख अपर्णा पांडे यांनी केली. यामध्ये त्यांनी वाचन प्रेरणा दिनाचा उद्देश स्पष्ट केला. माजी राष्ट्रपती भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या कार्याचा आढावा घेतला व वाचनाचे महत्त्व स्पष्ट केले.आपल्या मनोगतात प्र - कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी वाचनाचे आपल्या आयुष्यातील महत्त्व विशद केले. नुसते वाचून उपयोग नाही तर ते वाचन प्रत्यक्षात आणले पाहिजे.
वाचनाने विचाराचा पोत सुधारला पाहिजे असे ते म्हणाले. इतिहासातील अनेक दाखले देत आयुष्यात ज्ञान, कृती, विचार, उक्ती याची सांगड कशी घातली गेली पाहिजे याविषयी त्यांनी मार्गदर्शन करत केवळ वाचन प्रेरणा दिन एक दिवस साजरा करून चालणार नाही तर वाचन ही आपली जीवनशैली झाली पाहिजे असे ते म्हणाले.या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. संगीता जगताप या होत्या. आपल्या अध्यक्षीय भाषणात महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रा. डॉ. संगीता जगताप यांनी वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत तयार केलेल्या वाचनवेध या पुस्तकाविषयी माहिती दिली. शिक्षण संचालक (उच्च शिक्षण) मा. डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांचे त्यांनी या पुस्तकासाठी दिलेल्या शुभेच्छासंदेशासाठी आभार व्यक्त केले. तसेच सर्व संस्था पदाधिकारी यांनी दिलेल्या शुभ संदेशासाठी आभार व्यक्त केले व महाविद्यालयात केल्या जाणाऱ्या वाचनासंबंधीच्या उपक्रमांविषयी माहिती दिली.
वाचन वेध या पुस्तकात शंभर पुस्तकांचे परीक्षण केलेले असून याप्रसंगी प्र - कुलगुरू यांच्या हस्ते वाचनवेध मधील लेख लिहिलेल्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या पुस्तकाच्या प्रती भेट देण्यात आल्या. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. वंदना पिंपळे तसेच वाचनवेध पुस्तकाचे संपादक मंडळातील डॉ. विजय बालघरे उपस्थित होते. पाहुण्यांचा परिचय डॉ. अपेक्षा नाकतोडे यांनी करून दिला तर आभार प्रदर्शन ग्रंथालय विभाग प्रमुख कॅप्टन डॉ. विठ्ठल नाईकवाडी यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. मनीषा खैरे यांनी तर संयोजन मराठी विभाग प्रमुख प्रा.अपर्णा पांडे वग्रंथालय विभाग प्रमुख कॅप्टन विठ्ठल नाईकवाडी यांनी केले. त्यांना डॉ. दत्तात्रय फटांगडे, प्रा. प्रीती जोशी, प्रा. शर्मिला देवकाते, श्री. किरण कळमकर, श्री. प्रणीत पावले तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.