मुंबई : तळोजा एमआयडीसीतील भूखंड विभाजन प्रकरणाची चौकशी करून १५ दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले.विधानभवनात तळोजा एमआयडीसी येथील ए-३ भूखंड तक्रारीसंदर्भात आढावा बैठक झाली. यावेळी गृह विभागाचे कक्ष अधिकारी हेमंतकुमार मोहन, पोलीस निरीक्षक संजय पाटील, उद्योग विभागाचे अवर सचिव किरण जाधव, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी, महादेव इम्पेक्सचे प्रतिनिधी व तक्रारदार उपस्थित होते.
तळोजा एमआयडीसी येथील ए-३ या भूखंडाबाबत महादेव इम्पॅक्ट्स् कंपनीने नियमांचे उल्लंघन करत अवैधरित्या भूखंडाचे विभाजन करून इतर उद्योजकांना विक्री केल्याची तक्रार आहे. नियमानुसार उद्योग सुरू झाल्यानंतर व तो बंद पडल्यासच भूखंड विभाजनाची तरतूद आहे, मात्र संबंधित उद्योगाने कोणताही उद्योग सुरू न करता थेट भूखंड विभाजन करून विक्री केली. या प्रकरणात एमआयडीसीमार्फत सखोल चौकशी करुन १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश अण्णा बनसोडे यांनी दिले.या चौकशी पथकामध्ये पोलीस आयुक्त, नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस आयुक्त कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी, एमआयडीसीचे वरिष्ठ अधिकारी आणि प्रांत अधिकारी, पनवेल यांचा समावेश केला जाणार आहे.