सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • निवडणुकांमध्ये मूळ ओबीसीला फटका बसणार, ज्या मराठ्यांना प्रमाणपत्र मिळाले ते सगळ्या जागा घेऊन जाणार : वडेट्टीवार
  • मोठी बातमी: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीच्या व्यवहाराला धर्मादाय आयुक्तांकडून स्थगिती
  • पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरण व्यवहाराला स्थगिती देण्याचे धर्मदाय आयुक्त अमोघ कलोटी यांचे आदेश
  • कुणीही आपण सरकार असल्याच्या थाटात वागू नये, शनिवार वाड्याबाहेरच्या राड्यावरुन नीलम गोऱ्हेंचा मेधा कुलकर्णींना टोला
  • शनिवारवाड्यात सामूहिक नमाज पठण, पोलिसांकडून गुन्हा दाखल; मेधा कुलकर्णी- रुपाली ठोंबरेंमध्ये जुंपली
 जिल्हा

समाजातील प्रत्येक वंचित व्यक्तीला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासन कटिबद्ध – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

डिजिटल पुणे    20-10-2025 11:25:37

नागपूर  : – सामाजिक न्यायाच्या दृष्टीने एक व्यापक विचार आम्ही बाळगला आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या माध्यमातून शेवटच्या घटकातील माणसाला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी जी दूरदृष्टी बाळगली ती प्रत्यक्षात आम्ही समाजातील विविध घटकांना प्रत्ययास देत आहोत. त्यांना अभिप्रेत असलेल्या सामाजिक विकासासाठी आम्ही कटिबद्ध असून सामाजिक न्याय विभागाचा हा विविध योजनांतर्गत लाभार्थ्यांना थेट लाभ पोहचविण्याचा उपक्रम याचेच द्योतक असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

दिवंगत ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या सामाजिक न्याय विभागाच्या समारंभात ते बोलत होते. प्रधानमंत्री खनिज क्षेत्र कल्याण योजनेंतर्गत जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तींना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यादृष्टीने ई-रिक्षा व इतर वैयक्तिक लाभ योजना वाटप समारंभास महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, गृहनिर्माण तथा इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार श्यामकुमार बर्वे, सर्वश्री आमदार कृपाल तुमाने, परिणय फुके, डॉ. आशिष देशमुख, मोहन मते, चरणसिंग ठाकुर, संजय मेश्राम, राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग डागोर, सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, मनपा आयुक्त अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, सामाजिक न्याय विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

वंचित घटकांना स्वंयरोजगाराची साधने मिळण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून शासन प्रयत्नरत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपण महिलांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नांची शर्त केली आहे. राज्यात आपण २५ लाख दीदींना लखपती केले आहे. आजच्या घडीला राज्यात सुमारे ५० लाख दीदी आता लखपती दीदी झाल्या आहेत. लवकरच १ कोटी दीदींना लखपती करण्याचा संकल्प आपण पूर्ण करू असा, विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

जिल्ह्यातील मांग-गारुडी व इतर वंचित घटकातील व्यक्तींना विकासाच्या प्रवाहात घेण्यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन शासनाचे विशेष कॅम्प लावले. यातून या समाजाला त्यांच्या हक्काचे ओळखपत्र मिळाले. यामुळे रमाई आवास सारख्या योजना प्रभावीपणे त्यांच्यापर्यंत पाहचविणे आता सहज शक्य झाल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगून पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचा गौरव केला.

जिल्ह्यातील प्रत्येक आदिवासी व्यक्तीला ऊर्जा दाता करण्याची नाविन्यपूर्ण योजना राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी मांडली. यानुसार नाविन्यपूर्ण योजनेतून प्रत्येक आदिवासी घरावर सौरऊर्जा देण्याचे नियोजन झाले. या योजनेतील उपयोगीता लक्षात घेवून लवकरच अनुसूचित जाती व इतर मागासवर्ग घटकातील उपेक्षित लोकांनाही या योजनेचा लाभ पोहचू असे, सुतोवाच त्यांनी केले.

जिल्ह्यातील १ हजार महिला बचत गटांना व्यवसायासाठी प्रतीगट १ लाख रूपयांचा निधी – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

स्वयंरोजगाराच्या दृष्टीने अधिकाअधिक महिलांना आपल्या व्यवसायाला आकार देता यावा, त्यांच्या व्यावसायीक कल्पना प्रत्यक्ष साकारण्यासाठी जिल्ह्यातील १ हजार महिला बचत गटांना प्रती गट १ लाख रूपयांचा निधी लवकरच उपलब्ध करून देऊ असे, प्रतिपादन महसूल मंत्री तथा पालकंमत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. प्रधानमंत्री खनिज कल्याण योजनेंतर्गत सुमारे २० कोटी रूपयांचा निधी सामाजिक न्यायासाठी, वंचित घटकातील लोकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून आपण उपयोगात घेतला आहे. जिल्हा परिषद अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना, रमाई घरकूल योजनानांही आपण अधिक गती देऊ असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या निर्देशानुसार जिल्हा परिषदेंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक अंगणवाडी आपण कल्पक करणार आहोत. प्रत्येक गावापातळीवर शासनाच्या विविध विकास योजना प्रभावीपणे व पारदर्शकपणे पोहचाव्यात यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्र आता जिल्हा परिषदेच्या मुख्यालयाला जोडण्यासाठी एक परीपूर्ण वॉररूम साकारली जात असून याद्वारे आरोग्याच्या अधिक परिणामकारक सुविधा पोहोचवील्या जाणार असल्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले.

यावेळी वित्त राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी लवकरच दिव्यांग बांधवांनसाठी अधिक प्रभावीपणे शासकीय योजनांचा लाभ दिला जाणार असल्याचे सांगितले. यासाठी स्वतंत्र निधीची तरतूद केली असून प्रत्येक  जिल्हा वार्षिक योजनेतून यासाठी ठराविक रक्कम देण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करू, असे सांगितले.

यावेळी जिल्हा माहिती कार्यालयाने निर्मिती केलेल्या रमाई घरकुल योजनेच्या लघुपटाचे याचबरोबर ‘स्वप्न ते सत्य’ कॉफी टेबल बुकचे अनावरण करण्यात आले. कामठी तालुक्यातील वारेगाव शाळेतील अॅडव्हेंचर पार्कचे दुरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन या समांरभात करण्यात आले. कर्मवीर दादासाहेब गायकवाड स्वाभिमान व सबळीकरण योजनेंतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात ६ लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते शेत जमिनीचे कागदपत्र वाटप करण्यात आले. एकूण ४९ एकर २३ लाभार्थ्यांना देण्यात आली.  घर घर संविधान अंतर्गत प्रातिनिधीक स्वरूपात वरिष्ठ अधिकाऱ्यांना प्रस्ताविका देण्यात आल्या.

जिल्हा परिषद, नागपूर व महानगरपालिका, नागपूर अंतर्गत आशा व अंगणवाडी सेविकांना सायकलींचे वितरण करण्यात आले. विशेषत: दिव्यांग लाभार्थ्यांना स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी एकूण ७५५ ई-रिक्षा वितरित करण्यात आल्या. यातील २०० ई-रिक्षा पहिल्या टप्प्यात तर ५५५ ई-रिक्षा आजच्या दुसऱ्या टप्प्यात वितरित करण्यात आल्या. जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांना कार्यालयीन सुविधेसाठी एकूण ६ हजार ३३४ सायकलींचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाजकल्याण विभागाच्या सहायक आयुक्त सुकेशिनी तेलगोटे यांनी केले.


 Give Feedback



 जाहिराती