उरण : ``आजपर्यंतच्या आयुष्यात मी अनेक चढ-उतार पाहिले; परंतु वैरभावाने कुणाशी वागलो नाही. आमच्याकडे माणसे येत गेली आणि आम्ही त्यांना प्रोत्साहन आणि संधी दिली. त्यामुळे अनेकांनी चांगली भरारी घेतली. त्यातीलच एक जयवंत पाटील आहेत. आमच्या कामाची पद्धत अशी आहे, की आमच्याकडे गवताचे पाते आले तरी तलवार बनवण्याची क्षमता आमच्यात आहे. म्हणूनच आम्ही सन्मानाने जगतोय आणि इतरांनाही सन्मान देतोय. जयवंत पाटील यांचा अमृतमहोत्सवी होणारा वाढदिवस कौतुकसोहळा हा त्याचाच एक भाग आहे, असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि काँग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत जयवंत पाटील यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात म्हणाले. हा कार्यक्रम जेएनपीटी वसाहतीतील मैदानात सोमवारी (ता.१९) झाला.
ते पुढे म्हणाले, "जयवंत पाटील हे कुटुंबवत्सल आहेत. त्यांच्या नातवंडांनी, सुनांनी त्यांच्याविषयी बोलणे, हे कौतुकास्पद आहे. त्यांच्या सुना उच्चशिक्षित आणि सुजाण आहेत, तर मुलेही आपापल्या क्षेत्रांत भरारी घेतायत, हे आनंददायी चित्र असून जयवंत पाटील यांनी त्यांच्या आयुष्यात कमावलेली माणसे दिवाळी सण असूनही मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहणे, हे अभिमानास्पद आहे. जयवंत पाटील यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये प्रेम आणि जिव्हाळा आहे, म्हणूनच मी ब्राझीलवरून थेट त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमासाठी आलो आहे. त्यांनी एनएमजीकेएस संघटनेत उपाध्यक्षपदी सूत्रे घेतल्यानंतर रायगडमध्ये कामगारांसाठी उत्तम काम केले आहे, याची जाण मला आहे."
यावेळी जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील म्हणाले, "ते अतिशय विनोद बुद्धीचे असून ते सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांशी मिळूनमिसळून वागतात, पण काँग्रेसशी एकनिष्ठ आहेत."यावेळी उरण उत्कर्ष समितीचे गोपाळ पाटील म्हणाले, "जयवंत हा माझा मोठा भाऊच आहे, असे संबंध आणि मैत्री आहे. माझ्या राजकीय जीवनात माझा कायम पाठीराखा राहिला आहे."
जयवंत पाटील यांना त्यांच्या मुलांनी आलिशान गाडीतून व्यासपीठावर आणले, तेव्हा तो प्रसंग विलोभनीय होता. टाळ्यांच्या कडकडाटात आणि फटाक्यांच्या आतषबाजीत झालेली एन्ट्री चार चांद लावणारी ठरली. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पक्षाचा भव्य झेंडा घेऊन त्यांना सलामी दिली. यावेळी जयवंत पाटील यांच्यावर प्रेम करणाऱ्या अनेक क्षेत्रांतील मंडळींनी जेएनपीटी वसाहतीतील मैदान खचाखच भरले होते.
बोकडवीरा काँग्रेस कमिटीचे नेते, न्यू मॅरिटाईम अण्ड जनरल कामगार संघटनेचे वरिष्ठ उपाध्यक्ष जयवंत गंगाराम पाटील यांचा अमृतमहोत्सवी वाढदिवस अत्यंत उत्साही वातावरणात जेएनपीटी वसाहतीत साजरा करण्यात आला. यावेळी रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत, जेएनपीटीचे विश्वस्त दिनेश पाटील, उरण उत्कर्ष समितीचे अध्यक्ष गोपाल पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मिलिंद पाडगावकर, महाराष्ट्र फिशरमॅन अध्यक्ष मार्तंड नाखवा, उरण तालुका काँग्रेस अध्यक्ष विनोद म्हात्रे, रायगड भूषण एल. बी. पाटील, शिक्षक नेते नरसू पाटील, वैभव पाटील, किरीट पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करून जयवंत पाटील यांचा जीवनपट उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला.