मुंबई : ताज हॉटेल हे भारतातील सर्वात प्रसिद्ध हॉटेल्सपैकी एक मानले जाते. तथापि, हॉटेलमध्ये एका महिलेशी संबंधित एका घटनेने सोशल मीडियावर वाद निर्माण केला आहे. ताज हॉटेलमध्ये एक महिला जेवणासाठी गेली. ती खूर्चीवर मांडी घालून बसून जेवण करत असताना तिला तेथील मॅनेजरने तिला कसे बसायचे ते शिकवण्यास सुरुवात केली. महिलेने घटनेचे वर्णन करणारा व्हिडिओ रेकॉर्ड केला आणि तो सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर शेअर केला. त्यानंतर सोशल मीडियावर नव्या वादाला तोंड फुटलं आहे. श्रद्धा शर्मा असं या महिलेचं नाव असून त्या योरस्टोरी कंपनीच्या संस्थापक आहेत.
दिवाळीनिमित्त बहिणीसोबत ताज हॉटेलमध्ये जेवायला गेलेल्या श्रद्धा शर्माला तेथील मॅनेजरने बसण्याची पद्धत आणि चप्पल घालण्यावरून 'मॅनर्स' शिकवला. याची माहिती श्रद्धाने व्हिडिओ ट्विट करून दिली. तिच्या म्हणण्यानुसार, ती ताज हॉटेलमध्ये मांडी घालून बसली होती, जी एका ग्राहकाला आवडली नाही. त्याने मॅनेजरकडे तक्रार केली. तिला फाईन डायनिंगमध्ये व्यवस्थित बसण्याचा सल्ला दिला. कोल्हापुरी चप्पलऐवजी बंद बूट घालण्यास सांगितले. या घटनेमुळे महिलेने तीव्र नाराजी व्यक्त केली. यावर नेटीझन्सच्या संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत.
श्रद्धा शर्मा आणि त्यांची बहीण दिवाळीच्या दिवशी हाऊस ऑफ मिंगमध्ये जेवत होत्या. यावेळी शर्मा या मांडी घालून बसल्या होत्या. तेव्हा हॉटेल मॅनेजरने त्यांना तिच्या बसण्याच्या पद्धतीबाबत फटकारले. मॅनेजरने सांगितले की इतर पाहुण्यांना तिची मुद्रा त्रासदायक वाटू शकते, म्हणून तिला व्यवस्थित बसण्याची सूचना देण्यात आली. श्रद्धा शर्माने एक्सवर पोस्ट करत म्हटले की, 'कठोर परिश्रम करून जेवणासाठी आलेल्या एका सामान्य माणसाला अजूनही ताज हॉटेलमध्ये अपमानित केले जाते. मी फक्त मांडी घालून बसले यावरून मला अपमानित केले जात आहे.'
फक्त बसण्यावरच नाही, तर मॅनेजरने तिच्या पारंपारिक सलवार-कमीज आणि कोल्हापुरी चप्पल घालण्याबाबतही टीका केली. शर्मा म्हणाल्या की, 'मी स्वतःच्या मेहनतीने कोल्हापुरी चप्पल विकत घेतली, पण हॉटेल कर्मचारी मला यावरून सूचना देत आहेत. हे बरोबर आहे का?' दरम्यान, श्रद्धा पुढे म्हणाली की, मला हे समजते की हे एक 'चांगले रेस्टॉरंट आहे, अर्थातच, खूप श्रीमंत लोक इथे येतात आणि ते तुम्हाला एका विशिष्ट पद्धतीने बसून बंद शूज घालण्याची अपेक्षा ठेवतात'. "मात्र मला हे काळत नाही कि, मी कोल्हापुरी चप्पल घालते, जी मी माझ्या स्वतःच्या कष्टाच्या पैशाने विकत घेतली होती आणि इथे सभ्य पोशाख घालून आली होती. पण 'पाय खाली ठेवा' असे सांगणे किंवा माझी बसण्याची पद्धत आक्षेपार्ह होती, हे सांगणं चुकीचे आहे. जर एखाद्याला समस्या असेल तर ते दर्शवते की आपण अजूनही श्रीमंती, संस्कृती आणि वर्गाच्या या विभागणीत अडकलो आहोत, का? मी कठोर परिश्रम करते, म्हणूनच मी येथे आहे. मी स्वतः या जेवणाचा खर्च करत आहे, मग काय अडचण आहे?" असं हि तिने विचारले आहे.