सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • न भूतो न भविष्यती मोर्चा झाला पाहिजे, दिल्लीनेही दखल घेतली पाहिजे अशी तयारी करा; राज ठाकरेंचा मनसैनिकांना आदेश
  • सावधान ! पुढील चार दिवस वादळी पावसाची शक्यता, कमी दाबाचे पट्टे, चक्रीवादळ .. हवामान खात्याचा इशारा काय?
  • पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याचा संशय अन् वाद; डोक्यात वार करून संपवलं, हातावर रविराज टॅटूमुळं लागला सुगावा, इंदापुरातील कुजलेल्या मृतदेहाचा अखेर उलगडा
 जिल्हा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी म्हणजे एक विचार, एक प्रेरणास्रोत – राज्यपाल आचार्य देवव्रत

डिजिटल पुणे    25-10-2025 10:41:57

मुंबई  : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे केवळ भारताचे नेते नाहीत, तर ते एक विचार आहेत, एक प्रेरणास्रोत आहेत. त्यांचे जीवन हे मानवतेच्या सेवेचे आणि राष्ट्रहितासाठीच्या अखंड समर्पणाचे उत्तम उदाहरण आहे, असे प्रतिपादन राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.लेखक बर्जिस देसाई लिखित ‘मोदीज मिशन’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या यांच्या हस्ते राजभवन येथे झाले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे, लेखक बर्जिस देसाई तसेच अनेक प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.

राज्यपाल आचार्य देवव्रत म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या आयुष्यात अनेक अशक्य वाटणारे निर्णय घेतले, जसे कलम ३७० रद्द करणे, रामजन्मभूमीचा प्रश्न शांततेत सोडवणे. तसेच जागतिक स्तरावर भारताचा सन्मान वाढवणे, हे त्यांच्या दृढ इच्छाशक्तीचे द्योतक असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यपाल देवव्रत म्हणाले की, प्रधानमंत्री मोदी यांनी आपल्या २५ वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत एकही दिवस सुट्टी घेतलेली नाही. देश, समाज आणि मानवतेच्या सेवेसाठी सतत कार्य करणे, हीच त्यांची साधना आहे.राज्यपालांनी लेखक बर्जिस देसाई यांचे अभिनंदन करताना म्हटले की, या पुस्तकात प्रधानमंत्री मोदी यांच्या जीवनातील विविध पैलूंना सखोलतेने स्पर्श केला असून, हे पुस्तक तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. सर्वांनी हे पुस्तक वाचून, त्यातील विचारांद्वारे आपल्या जीवनात प्रेरणा घ्यावी. प्रधानमंत्री मोदी हे देशाच्या सन्मानाचे प्रतीक आहेत; त्यांचे कार्य हे प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद असल्याचेही राज्यपाल देवव्रत म्हणाले.

‘मोदीज मिशन’ पुस्तकातून राष्ट्रनिर्मितीच्या प्रवासाचे दर्शन – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी भारताच्या विकासाची जी पायाभरणी केली आहे, ती अवर्णनीय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ‘मोदीज मिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशनाच्या वेळी केले.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या पुस्तकात प्रधानमंत्री मोदी यांच्या जीवनाचा केवळ आढावा घेतलेला नाही, तर एका व्यक्तीच्या मूल्यांची, जाणीवेची आणि राष्ट्रासाठी झटण्याच्या वृत्तीची निर्मिती कशी होते, हे दाखवले आहे.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सेवा आणि संन्यास या दोन्ही मार्गांचा अनुभव घेतल्यानंतर, संघकार्याद्वारे राष्ट्रभावना जागृत करण्याचा संकल्प केला.त्यांच्या नेतृत्वाखाली देशात 370 कलम रद्द करणे, राम मंदिर उभारणी, नागरिकत्व कायदा किंवा तिहेरी तलाक बंदी यांसारख्या ऐतिहासिक निर्णयांचा साक्षीदार झाला आहे. या सर्व निर्णयांच्या मागे राष्ट्रचेतनेची जाणीव असल्याचे त्यांनी सांगितले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी न्यायव्यवस्थेचा सन्मान राखला आणि संस्थांना अधिक मजबूत केले. सरकार आणि न्यायसंस्था यांच्यातील संतुलन राखत त्यांनी लोकशाही संस्थांवरील विश्वास अधिक दृढ केला असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हणाले.अर्थव्यवस्थेसंदर्भात मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चरच्या माध्यमातून भारताने जगातील विकसित अर्थव्यवस्थांनाही मागे टाकले आहे. नोटबंदी, जीएसटी आणि आयकर सुधारणा यांसारख्या उपाययोजनांनी करपालन संस्कृती रुजवली. पूर्वी कर टाळणे ‘पुरुषार्थ’ मानणाऱ्या समाजात आता करपालन ही नवी मूल्यव्यवस्था तयार झाली आहे.प्रधानमंत्री मोदी यांनी समाजातील गरीब, शेतकरी, युवा आणि महिला हेच भारताच्या आकांक्षांचे केंद्र मानले. या चार घटकांच्या उन्नतीतच विकसित भारताचा पाया असून ‘मोदीज मिशन’ पुस्तक भारताच्या विकासगाथेचा आरसा आहे असेही श्री.फडणवीस म्हणाले.

“मोदी म्हणजे देशाचे वर्तमान आणि भविष्य” – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

प्रधानमंत्री “नरेंद्र मोदी हे फक्त एक व्यक्तिमत्व नाहीत, तर देशाचे वर्तमान आणि भविष्य आहेत. त्यांच्या कामगिरीचा प्रवास संघर्षमय असून, तो प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी आहे,” असे उद्गार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘मोदीज मिशन’ या पुस्तकाच्या प्रकाशन प्रसंगी काढले.हे पुस्तक फक्त नरेंद्र मोदींच्या चरित्राचे वर्णन नाही, तर त्यांच्या कार्याची सत्यकथा आहे. मोदींच्या व्यक्तिमत्वाची व्याप्ती एका पुस्तकात सामावणे शक्य नाही, कारण त्यांनी अशक्याला शक्य करून दाखवले आहे. मागील अकरा वर्षांत भारतात झालेले सकारात्मक बदल जगभरात कौतुकास्पद ठरले आहेत, असे उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

जगातील अर्थव्यवस्था डगमगली असतानाही भारताची अर्थव्यवस्था चौथ्या स्थानी आली आहे आणि तिसरे स्थान मिळविण्याचे स्वप्न साकार होईल. ‘डिजिटल इंडिया’, ‘मेक इन इंडिया’, ‘आत्मनिर्भर भारत’ यांसारख्या उपक्रमांचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढणे, महिलांना आत्मनिर्भर बनविणे, भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देणे, हे सर्व मोदींच्या नेतृत्वामुळे शक्य झाले.या कार्यक्रमात “मोदीज मिशन” पुस्तकाचे लेखक बर्जिस देसाई यांनीही विचार मांडले.


 Give Feedback



 जाहिराती