पुणे: पुणे जिल्ह्यातील नरसापूर येथे घडलेल्या अत्यंत संतापजनक घटनेनंतर राज्यभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेने समाजमन हादरले आहे. या पार्श्वभूमीवर सर्व स्तरांतून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी जोर धरत आहे.
या प्रकरणावर मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेते-दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनीही संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत त्यांनी सरकारच्या भूमिकेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “अशा गुन्हेगारांवर तात्काळ कठोर कारवाई झाली, तरच सरकार खऱ्या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर चालत आहे, असे मानता येईल,” असा इशारा त्यांनी दिला.
दरम्यान, घटनेनंतर स्थानिक नागरिकांमध्येही प्रचंड संताप पाहायला मिळाला. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्याला पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, दोषीला कडकात कडक शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.या घटनेमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, महिलांच्या आणि लहान मुलांच्या सुरक्षेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे.