पुणे — वडगाव बुद्रुक परिसरातील रहिवाशांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणाऱ्या ओढ्यालगत आर.सी.सी. सिमाभिंत बांधकामाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात पार पडले. घुलेनगर येथील श्री स्वामी समर्थ सोसायटीपासून रेणुका नागरीतील माईस्मृती सोसायटीपर्यंत उभारण्यात येणाऱ्या या सिमाभिंतीचे भूमिपूजन आमदार भिमराव अण्णा तापकीर यांच्या हस्ते करण्यात आले.
या वेळी नगरसेवक हरिदास कृष्णा चरवड यांच्या पुढाकारातून साकार होणाऱ्या या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला. कार्यक्रमास नगरसेविका जयश्रीताई भूमकर, सामाजिक कार्यकर्ते विकासबापू दांगट,युवा नेते सागर भूमकर,भाजपा खडकवासला मंडलाध्यक्ष यशवंत लायगुडे, युवा नेते सारंग नवले, दशरतजी मणेरे, दिपक जोरी तसेच परिसरातील अनेक मान्यवर आणि रहिवासी उपस्थित होते.
वडगाव बुद्रुक परिसरात पावसाळ्यात ओढ्याला येणाऱ्या पुरामुळे वारंवार पाणी वस्तीत शिरण्याच्या घटना घडतात. अचानक वाढणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे घरांचे नुकसान, मालमत्तेची हानी तसेच नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होत असल्याने या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची गरज होती. त्याच पार्श्वभूमीवर हा आर.सी.सी. सिमाभिंत प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.
या सिमाभिंतीमुळे पावसाळ्यातील पूरस्थिती नियंत्रणात राहण्यास मदत होणार असून रहिवासी भागात पाणी शिरण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच ओढ्याच्या काठाची धूप रोखली जाईल, कचऱ्याचा साठा व वाहून जाणे यावर नियंत्रण येईल आणि परिसरातील स्वच्छता सुधारेल. परिणामी नागरिकांच्या जीवित व मालमत्तेचे संरक्षण होऊन परिसर अधिक सुरक्षित होणार आहे.
स्थानिक नागरिकांनी या उपक्रमाचे स्वागत करत समाधान व्यक्त केले असून, या कामामुळे वडगाव बुद्रुक परिसराच्या सुरक्षिततेत आणि नियोजित विकासात मोलाची भर पडणार असल्याची भावना व्यक्त केली आहे.