बारामती : बारामती पोटनिवडणुकीत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विक्रमी मताधिक्याने दणदणीत विजय मिळवत इतिहास रचला आहे. त्यांना तब्बल २ लाख १८ हजार ९३० मते मिळाली असून, विरोधात असलेल्या २२ उमेदवारांसह ‘नोटा’ला मिळून केवळ ४८३७ मते पडली. या विजयासह त्यांनी दिवंगत अजित पवार यांचा २०१९ मधील मताधिक्याचा विक्रमही मोडला आहे.
या विजयानंतर माध्यमांशी संवाद साधताना सुनेत्रा पवार भावूक झाल्या. “दादांनंतरची ही पहिली निवडणूक आहे. मन खरं तर खूप भरून येत आहे. मात्र बारामतीकरांनी दादांवरील विश्वास कायम ठेवत मला पाठिंबा दिला, ही त्यांच्या कामांना दिलेली खरी श्रद्धांजली आहे,” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.त्या पुढे म्हणाल्या की, बारामतीकरांनी दाखवलेला विश्वास ही मोठी जबाबदारी असून, दादांनी पाहिलेली विकासाची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. जनतेच्या अपेक्षांवर उतरून काम करण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
या निवडणुकीत सर्वपक्षीय पातळीवर त्यांना मोठा पाठिंबा मिळाल्याचे दिसून आले. विशेष म्हणजे, त्यांच्या विरोधातील एकाही उमेदवाराला शंभर मतांचा आकडाही पार करता आला नाही.दरम्यान, या विजयासह सुनेत्रा पवार यांनी उत्तर प्रदेशातील सुनील कुमार शर्मा यांचा २०२२ मधील २ लाख १४ हजार मताधिक्याचा विक्रमही मागे टाकल्याचा दावा केला जात आहे.
या पार्श्वभूमीवर पार्थ पवार यांनीही कार्यकर्त्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. “हा आनंदाचा क्षण असला तरी जल्लोष टाळावा. आगामी काळात जनतेसाठी काम करण्यावर भर देणार,” असे ते म्हणाले.बारामती पोटनिवडणुकीतील हा निकाल केवळ विजय नसून, पवार कुटुंबावरील आणि त्यांच्या विकासकामांवरील जनतेच्या अढळ विश्वासाची नोंद म्हणून पाहिला जात आहे.