मुंबई : बदलापूर येथे १३ ते १७ मे या काळात छत्रपती शिवाजी महाराज चषक राज्यस्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा होत असून या स्पर्धेचा आढावा आज उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. यावेळी स्पर्धेच्या बोधचिन्हाचे अनावरण उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.
सह्याद्री अतिथीगृह येथे झालेल्या या बैठकीस आमदार किसन कथोरे, कुळगाव- बदलापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा रुचिता घोरपडे, उपमुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव असीम गुप्ता, क्रीडा विभागाचे उपसंचालक नवनाथ फरताडे, जिल्हा क्रीडा अधिकारी सुवर्णा बारटक्के, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. कैलास पवार, महाराष्ट्र व्हॉलीबॉल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. ठाणे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यावेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते.
१८ व २१ वर्षीय मुला मुलींसाठी ही राज्यस्तरीय स्पर्धा असून क्रीडा विभाग आणि कुळगाव बदलापूर नगरपरिषदेच्या माध्यमातून त्याचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेसाठीच्या आयोजन समितीचे अध्यक्ष जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. यावेळी बैठकीत खेळाडूंची निवास आणि भोजन व्यवस्था, मैदान तयारी, आरोग्य व्यवस्था आदी बाबींवर चर्चा करण्यात आली. खेळाडूंच्या निवासाची चांगली व्यवस्था करा, त्यासाठी लागणारा २५ लाखांचा निधी सिडकोच्या माध्यमातून देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. दरम्यान, यावेळी ठाणे विभागीय क्रीडा संकुलाबाबत देखील आढावा घेण्यात आला.