पुणे : शिक्षणाचं माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या शिक्षण विभागाने शहरातील तब्बल 13 शाळा अनधिकृत असल्याचं जाहीर केलं असून, या शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा प्रवेश घेऊ नये, असा स्पष्ट इशारा पालकांना देण्यात आला आहे.
महापालिकेने विविध भागांतील शाळांची तपासणी केल्यानंतर ही कारवाई केली. संबंधित शाळांकडे शासन आणि स्थानिक प्रशासनाची आवश्यक मान्यता नसल्याचं तपासात उघड झालं आहे. त्यामुळे या शाळा नियमबाह्य पद्धतीने सुरू असल्याचे समोर आले आहे.
शिक्षण विभागाने जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे की, अनधिकृत शाळांमध्ये प्रवेश घेतल्यास विद्यार्थ्यांचं मोठं शैक्षणिक नुकसान होऊ शकतं. अशा शाळांना अधिकृत प्रमाणपत्र किंवा निकाल देण्याचा अधिकार नसतो. परिणामी, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक वर्ष वाया जाण्याची शक्यता असून पालकांची आर्थिक फसवणूकही होऊ शकते.
दरम्यान, महापालिकेने पालकांना प्रवेश घेण्यापूर्वी संबंधित शाळेची शासनमान्यता आणि नोंदणी तपासण्याचं आवाहन केलं आहे. विशेष म्हणजे या यादीतील अनेक शाळांची नावं आकर्षक आणि इंग्रजी माध्यमातील असल्याने पालकांची दिशाभूल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
पुणे महापालिकेने जाहीर केलेल्या अनधिकृत शाळांची यादी
न्यू मिलेनियम स्टार इंग्लिश मीडियम स्कूल – चिंतामणी नगर, बिबवेवाडी
महात्मा गांधी प्रशाला – संजय पार्क, येरवडा
टीम्स तकवा इस्लामिक स्कूल अँड मकतब – NIBM रोड, कोंढवा खुर्द
सेंट व्ह्यू इंटरनॅशनल School – कोंढवा बुद्रुक
इमॅन्युअल पब्लिक स्कूल – महंमदवाडी रोड, हडपसर
आकांक्षा अकॅडमी स्कूल – लोहगाव
आर्यन पब्लिक स्कूल – मानाजी नगर, नऱ्हे
लेगसी हाय स्कूल – अशरफ नगर, कोंढवा बुद्रुक
शिबली नोमानी इंग्लिश मीडियम स्कूल – कोंढवा बुद्रुक
ऑर्किड द इंटरनॅशनल स्कूल – उंड्री
ग्लोबल एज्युकेशन ट्रस्ट पुणे इकरा इस्लामिक स्कूल – कौसरबाग, कोंढवा
ग्लोबल इंग्लिश मीडियम स्कूल – आंबेगाव बुद्रुक
आर्यन वर्ल्ड स्कूल – उंड्री
महापालिकेच्या या निर्णयामुळे शहरातील शिक्षण व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून, पालकांनी शाळा निवडताना अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.