सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, मुलींनी पुन्हा मारली बाजी
  • पुणेकरांनो अलर्ट! शहरातील 13 बोगस शाळांची यादी जाहीर; पालकांनी प्रवेशापूर्वी मान्यता तपासा
  • इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात चैन स्नॅचिंग; पोलिसांनी दोन भामट्यांना ठोकल्या बेड्या, मुद्देमाल हस्तगत
  • मोठी बातमी : केवळ बारामतीच नव्हे तर सुनेत्रा पवार 2029 मध्ये मुख्यमंत्रि‍पदाच्याही उमेदवार : जय पवार
  • मोठी बातमी! एकनाथ शिंदेंचं हेलिकॉप्टर वादळात फसलं; सुदैवाने सुखरुप लँडिंग, जुहूत उतरवलं
 क्राईम

उरण न्यायालयासमोर पडक्या इमारतीत गांजाची नशा; पोलिसांचा छापा, चौघांवर गुन्हा दाखल ;निर्जन इमारती ठरताहेत नशेबाजांचे अड्डे

विठ्ठल ममताबादे ( प्रतिनिधी )    08-05-2026 11:04:50

उरण : उरण शहरात न्यायालयाच्या अगदी समोरच अलिबाग वन विभागाच्या वापरात नसलेल्या पडक्या इमारतीत गांजा ओढणाऱ्या चौघा तरुणांना उरण पोलिसांनी शनिवारी दुपारी रंगेहाथ पकडले. या कारवाईमुळे उरणमधील निर्जन व पडक्या इमारती नशेबाजांचे अड्डे बनत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले असून नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. या प्रकरणी उरण पोलीस ठाण्यात गु.र.क्र. १३०/२०२६ अन्वये अंमली पदार्थ विरोधी कायदा १९८५ चे कलम ८ (क), २७ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
३ मे २०२६ रोजी दुपारी १२:३५ वाजताच्या सुमारास उरण कोर्टाच्या समोर असलेल्या अलिबाग वन विभागाच्या जुन्या, पडक्या इमारतीत काही तरुण अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली. माहिती मिळताच पोउपनि गोविंद केंद्रे व पथकाने दुपारी १२:२५ ते १२:५५ या वेळेत घटनास्थळी छापा टाकला. त्यावेळी सौरभ बिस्वनाथ प्रामाणीक, वय ३०, रा. अर्श टॉवर बी/२०१, उरण कोर्ट जवळ; हर्षल विनायक भोईर, वय २४, रा. भोईरआळी, नवीन शेवा; हेमंत बबन कोळी वय ३२ रा. घर नं. ५६/डी  हनुमान कोळीवाडा राम मंदिरासमोर; आणि जुगल लक्ष्मण पाटील, वय २३, रा. पाण्याचे टाकीजवळ केगाव आवेडा हे चौघेजण 'गांजा' या अंमली पदार्थाचे सेवन करताना आढळले. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, भारतीय नागरी सुरक्षा संहिता कलम ३५(३) अन्वये चौघांनाही नोटीस देऊन सोडण्यात आले आहे. 
 
या घटनेची नोंद ३ मे २०२६ रोजी दुपारी ३:२३ वाजता उरण पोलीस ठाण्यात करण्यात आली. गुन्हा दाखल करण्याचे काम पोउपनि निलेश कोंडाळकर यांनी केले असून प्राथमिक तपास पोउपनि गोविंद केंद्रे करत आहेत. 
 
उरण शहरात गेल्या काही महिन्यांपासून अंमली पदार्थांच्या वापराच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. विशेषतः समुद्रकिनारी असलेल्या केगाव, पिरवाड, दांडा तसेच शहरातील पडक्या इमारती, बंद पडलेले गोडाऊन व निर्जन जागा यांचा वापर नशेसाठी केला जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच गांजा सेवन प्रकरणी एकावर कारवाई करण्यात आली होती. उरण हे जेएनपीटी बंदर व द्रोणागिरी नोडमुळे वेगाने विकसित होत असले तरी, येथील सामाजिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. 
 
न्यायालयासारख्या महत्त्वाच्या ठिकाणासमोरच दिवसाढवळ्या नशा केली जात असल्याने कायद्याचा धाक राहिला आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. पडक्या सरकारी इमारतींची डागडुजी करावी किंवा त्यांना कुलूप लावून संरक्षित करावे, जेणेकरून त्या गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनणार नाहीत, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. तसेच शाळा-महाविद्यालय परिसर, न्यायालय, बस स्थानक अशा गर्दीच्या ठिकाणी पोलिसांची गस्त वाढवावी, सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी, अशी मागणीही जोर धरत आहे. 
 
अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांची संख्या वाढत असून त्यासाठी समुपदेशन केंद्रे व जनजागृती मोहीम राबवण्याची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. केवळ कारवाई करून हा प्रश्न सुटणार नाही, तर पालक, शिक्षण संस्था व पोलिस यांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. या घटनेमुळे उरणमधील वाढत्या नशेखोरीवर पुन्हा प्रकाश पडला असून पोलीस प्रशासनाने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.


 Give Feedback



 जाहिराती