पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांनी फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल शुक्रवारी जाहीर केला. यंदा राज्याचा एकूण निकाल 92.09 टक्के लागला असून तब्बल 179 विद्यार्थ्यांनी 100 टक्के गुण मिळवत विशेष कामगिरी केली आहे. राज्यातील 6 हजार 612 शाळांचा निकाल शंभर टक्के लागला आहे.
यावर्षी राज्यभरातील पुणे, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, लातूर, कोकण आणि छत्रपती संभाजीनगर या नऊ विभागीय मंडळांतून 15 लाख 55 हजार 026 नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 15 लाख 42 हजार 472 विद्यार्थी परीक्षेला बसले आणि 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
मुलींनी यंदाही निकालात बाजी मारली आहे. मुलींचा उत्तीर्णतेचा टक्का 94.96 राहिला असून मुलांचा निकाल 89.56 टक्के लागला आहे. म्हणजेच मुली मुलांपेक्षा 5.40 टक्क्यांनी पुढे राहिल्या आहेत.
राज्यातील विभागनिहाय निकालात कोकण विभाग अव्वल ठरला असून तेथील निकाल 97.62 टक्के लागला. तर सर्वात कमी निकाल छत्रपती संभाजीनगर विभागाचा 88.41 टक्के नोंदवला गेला.
विभागनिहाय दहावी निकाल 2026
कोकण विभाग – 97.62%
मुंबई – 94.97%
कोल्हापूर – 95.47%
पुणे – 94.24%
नाशिक – 90.53%
अमरावती – 90.50%
नागपूर – 89.07%
लातूर – 88.42%
छत्रपती संभाजीनगर – 88.41%
दरम्यान, यंदाच्या परीक्षेत 4 लाख 82 हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीत यश मिळवले आहे. तसेच 20 विषयांचा निकाल 100 टक्के लागल्याची माहिती मंडळाकडून देण्यात आली.
दहावीचा निकाल कुठे पाहाल?
sscresult.mahahsscboard.in
महाहएसएससी बोर्ड अधिकृत वेबसाइट
DigiLocker Results
Target Publications Results
Navneet Results