सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
  • महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, मुलींनी पुन्हा मारली बाजी
 DIGITAL PUNE NEWS

ऐकण्याची शक्ती गमावली, पण जिद्द हरली नाही; लीप रीडिंगच्या जोरावर नागपूरच्या शांभवीचं दहावीत 94.2% गुणांसह घवघवीत यश

डिजिटल पुणे    08-05-2026 16:46:26

नागपूर : जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर कोणतीही अडचण पार करता येते, हे नागपूरच्या शांभवी पंचबुद्धे हिने सिद्ध करून दाखवले आहे. ऐकण्याची क्षमता पूर्णपणे गमावूनही शांभवीने दहावीच्या परीक्षेत तब्बल 94.2 टक्के गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विशेष म्हणजे, तिने कोणत्याही राईटरची मदत न घेता स्वतःच परीक्षा लिहिली.

शांभवी पाचवीत असताना गंभीर कफाच्या त्रासामुळे तिची ऐकण्याची क्षमता कमी होऊ लागली. सातवीपर्यंत पोहोचेपर्यंत तिला पूर्णपणे ऐकू येणे बंद झाले. मात्र तिच्या कुटुंबीयांनी तिला विशेष शाळेत न पाठवता सामान्य विद्यार्थ्यांसोबतच शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. नागपूरमधील सोमलवार शाळेनेही तिला पूर्ण सहकार्य केले.

शांभवीला वर्गात पहिल्या बाकावर बसण्याची परवानगी देण्यात आली होती. शिक्षक शिकवत असताना त्यांच्या ओठांच्या हालचाली ओळखून ती ‘लीप रीडिंग’च्या माध्यमातून अभ्यास समजून घेत होती. बोर्डाच्या नियमानुसार तिला राईटरची सुविधा मिळू शकत होती, मात्र तिने स्वतः पेपर लिहिण्याचा निर्धार केला आणि त्यात यशस्वी ठरली.

दरम्यान, नागपूरमधील आणखी एका घटनेने सर्वांचे लक्ष वेधले. खिलज आणि खुशी चांदेवार या जुळ्या भाऊ-बहिणींनी दहावीच्या परीक्षेत अगदी समान म्हणजेच 97.8 टक्के गुण मिळवत अनोखा योगायोग साधला आहे.

दोघांनीही अभ्यासात एकमेकांना मदत केली. नोट्स शेअर करणे, शंका सोडवणे आणि अभ्यासात सहकार्य करत त्यांनी हा प्रवास पूर्ण केला. विशेष म्हणजे, काही विषयांत दोघांच्या गुणांत फरक असला तरी एकूण टक्केवारी मात्र समान राहिली. बहिणीने सोशल स्टडीजमध्ये आघाडी घेतली, तर भावाने गणितात अधिक गुण मिळवले.यंदाच्या दहावीच्या निकालात मुलींनी पुन्हा एकदा बाजी मारली आहे. मुलींचा निकाल 94.96 टक्के लागला असून मुलांची टक्केवारी 90.56 इतकी नोंदवली गेली.

विभागनिहाय निकालात कोकण विभाग अव्वल ठरला असून त्याचा निकाल 97.62 टक्के लागला. त्याखालोखाल मुंबई विभागाचा 94.97 टक्के आणि पुणे विभागाचा 94.24 टक्के निकाल लागला. नागपूर विभागाचा निकाल 89.07 टक्के नोंदवण्यात आला.राज्यातून यंदा दहावी परीक्षेसाठी 15 लाख 55 हजार 26 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 14 लाख 20 हजार 486 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.


 Give Feedback



 जाहिराती