पश्चिम बंगाल : पश्चिम बंगालमध्ये भाजपच्या मोठ्या विजयानंतर मुख्यमंत्रीपदासाठी अखेर शुभेंदू अधिकारी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत शुभेंदू अधिकारी यांची पश्चिम बंगालच्या नव्या मुख्यमंत्रिपदी घोषणा केली.
भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडली. या बैठकीत विधिमंडळ पक्षनेतेपदासाठी जवळपास आठ प्रस्ताव प्राप्त झाले होते, मात्र सर्व प्रस्तावांमध्ये एकाच नावाचा उल्लेख होता. दुसऱ्या नावासाठी वेळ देण्यात आला, तरी अन्य कोणतेही नाव समोर आले नाही. त्यानंतर केंद्रीय पर्यवेक्षक म्हणून अमित शाह यांनी शुभेंदु अधिकारी यांना विधिमंडळ पक्षनेते म्हणून जाहीर केले.
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने 207 जागांवर विजय मिळवल्यानंतर पक्ष कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुभेंदू अधिकारी यांच्या नावाची घोषणा होताच आमदारांनी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
बैठकीदरम्यान अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेचे आभार मानत, “जनतेने भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला आहे. हा विश्वास कायम ठेवण्यासाठी सरकार सर्वोत्तम कामगिरी करेल,” असे सांगितले.
तसेच त्यांनी “सोनार बांगला” घडवण्याच्या दिशेने सरकार काम करणार असल्याचे स्पष्ट केले. बंगालची संस्कृती, परंपरा आणि विकास यांना प्राधान्य देत रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, महर्षी अरविंद आणि रवींद्रनाथ टागोर यांच्या विचारांचा बंगाल उभारण्याचा निर्धारही अमित शाह यांनी व्यक्त केला.अमित शाह यांनी या विजयाला ऐतिहासिक संबोधत, “श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांवर आधारित सरकार 1950 नंतर प्रथमच पश्चिम बंगालमध्ये स्थापन होत आहे,” असे म्हटले.