सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
  • महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, मुलींनी पुन्हा मारली बाजी
 जिल्हा

कृषी विभागाने खते व बियाणे पुरवठा सुरळीत होईल याची दक्षता घ्यावी – रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले

डिजिटल पुणे    09-05-2026 12:14:30

रायगड-अलिबाग  : आगामी खरीप हंगाम लक्षात घेता बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध असण्याच्या दृष्टीने परिपूर्ण नियोजन करा तसेच कोणत्याही परिस्थितीत खते, बियाणे यांची टंचाई भासणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश रोजगार हमी योजना, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी दिले.जिल्हा नियोजन भवन सभागृहात आयोजित खरीप हंगाम आढावा बैठकीत मंत्री भरत गोगावले बोलत होते. या बैठकीला आमदार महेंद्र दळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर, सभापती वैकुंठ पाटील, जिल्हाधिकारी किशन जावळे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अतिरिक्त मुख्य कार्यकारी डॉ.रुपाली सातपुते, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे आदी उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री भरत गोगावले म्हणाले की, खरीप हंगामामध्ये बियाणे आणि खतांचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर जाणवतो. त्यामुळे या दोन्हीचे नियोजन आवश्यक आहे. पीक पेरणी क्षेत्राला आवश्यक असणाऱ्या बियाण्यांची उपलब्धता होण्यासाठी कृषी विभागाचे नियोजन महत्त्वाचे ठरणार आहे. गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे, खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी अशा सूचना मंत्री भरत गोगावले यांनी दिल्या. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्याप्रमाणे रायगड जिल्ह्यातील आंबा बागायतदारांचे पंचनामे पूर्ण करण्याची कार्यवाही तातडीने करावी.  शेतकरी हवालदिल झाला असून त्यांना दिलासा देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात.  कोकणातील शेतकरी हा छोटा असून त्यांना ज्या लागणाऱ्या सोयी-सुविधा देणे आपली जबाबदारी आहे असेही त्यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यात भात व नाचणी पिकांच्या वाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे. पुढच्या भावी पिढीसाठी काही करायचे असेल तर आपल्याला मेहनत करणे ही काळाची गरज आहे.  वन्यप्राण्यांपासून शेतीचे संरक्षण करण्याकरिता जिल्हा परिषद सेसमधून अनुदान दिले जाते. या अनुदानाचे योग्य ते नियोजन करुन शेतकऱ्यांच्या शेतीचे वन्यप्राण्यांपासून होणार नुकसान कसे टाळता येईल ते पहावे.  वन्यप्राण्यांपासून संरक्षण करण्याकरिता अधिकारी वर्गाला प्रशिक्षण देण्यात यावे. या प्रशिक्षित अधिकाऱ्यांकडून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे अशा सूचना त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या. हे शासन बळीराजाचे असून शेतकऱ्यांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा शासनाकडून पुरविण्यात येतात.  प्रत्येक अधिकाऱ्यांनी मनापासून काम केल्यास आपण शेतकऱ्यांना सक्षम बनवू शकतो. खरीप पीक हंगामासाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा सुरळीत झाला पाहिजे. एकही शेतकरी पीक कर्जापासून वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. पीक कर्जाचे देण्यात आलेले उद्दिष्ट पूर्ण करा.  शेतकऱ्यांना पीक विम्याची समस्या जाणवते. पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना फायदा होण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेने लक्ष देण्याची गरज आहे.

तसेच शेतकऱ्यांना नवीन पिके घेण्यासाठी प्रोत्साहन देण्यात यावे. हळदी पीक घेण्यात यावे व हळदीचे क्षेत्र वाढविण्यासाठी सामूहिक प्रयत्न करावेत अशा सूचनाही मंत्री श्री. गोगावले यांनी दिल्या.बैठकीच्या सुरूवातीला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वंदना शिंदे यांनी खरीप हंगामपूर्व तयारी व नियोजनाचा आढावा संगणकीय सादरीकरणाद्वारे सादर केला.यावेळी जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविलेल्या शेतकऱ्यांना बियांण्याचे तसेच उत्कृष्ट काम केलेल्या कृषी अधिकाऱ्यांचा मान्यवरांचा हस्ते प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तसेच शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या माहितीपुस्तिकांचे मान्यवरांच्या हस्ते विमोचनही करण्यात आले. बैठकीस सर्व संबंधित विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.


 Give Feedback



 जाहिराती