पुणे : नगरसेवक सुरज लोखंडे व प्रिया शिवाजी गदादे यांनी आयोजित केलेल्या ‘कोकण महोत्सव २०२६’ला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या कोकण महोत्सवचे आयोजन साई जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष गीता मोहोरकर यांच्या संकल्पनेतून करण्यात आले आहे.कलाग्राम(पु. ल. देशपांडे उद्यान,सिंहगड रस्ता ) परिसरात दि .७ ते १० मे २०२६ या कालावधीत हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. शंभरहून अधिक स्टॉल असलेल्या या महोत्सवाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे .सकाळी १० ते रात्री १० अशी या महोत्सवाची वेळ असून प्रवेश विनामूल्य आहे.
पारंपरिक ढोल-ताशांच्या गजरात, कोकणच्या लोककला, संस्कृती आणि खाद्यपरंपरेचे दर्शन घडवत महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले.मुकेश पोटे', महाड प्रतिष्ठाण , नरेंद्र गंजे, महेंद्र गंजे ,अजय कुडले,सुरज रेणुके, ऋषिकेश ठोंबरे, चेतन चव्हाण, प्रणव भोसले, किरण रेणुके, प्रदीप मानकर यांनी आयोजनासाठी कष्ट घेतले . कोकणातील सुप्रसिद्ध दशावतार, पालखी सोहळा,नमन,शक्ती-तुरे मुकाबला, मायबोली महाराष्ट्राची सांस्कृतिक नृत्याविष्कार आणि पारंपरिक लोककला भारूड सादर करण्यात आल्या. कोकणातील अस्सल हापूस आंबा, सुका मेवा, मसाले, पारंपरिक खाद्यपदार्थ तसेच विविध हस्तकला वस्तूंचे आकर्षक स्टॉल्स नागरिकांचे लक्ष वेधून घेत होते.त्यामुळे पुण्यात कोकण अवतरल्याचा अनुभव मिळत आहे.
महोत्सवात लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांसाठी विविध मनोरंजनात्मक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोकणची संस्कृती, परंपरा आणि खरेदी यांचा सुंदर संगम अनुभवण्यासाठी पुणेकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले.