सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मनोहर भोसलेनंतर माढ्यात आणखी एक भोंदू बाबाचा भांडाफोड; फसवणूक करणाऱ्या वीरकर महाराजला साखर झोपेतच आश्रमातून पोलिसांनी उचललं, गुन्हा दाखल
  • महाराष्ट्र बोर्ड दहावीचा निकाल जाहीर; राज्याचा निकाल ९२.०९ टक्के, मुलींनी पुन्हा मारली बाजी
 शहर

शाईफेक प्रकरणानंतर संग्राम भंडारेंची पहिली प्रतिक्रिया; “लवांडेंनी पुन्हा गुरूंचा अपमान केला तर सोडणार नाही”

डिजिटल पुणे    09-05-2026 14:53:14

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांच्यावर आळंदी परिसरात शाईफेक झाल्यानंतर या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी संग्राम भंडारे, अक्षय कांचन यांच्यासह 12 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर संग्राम भंडारे यांनी व्हिडीओद्वारे प्रतिक्रिया देत आपल्या भूमिकेचे समर्थन केले.

संग्राम भंडारे यांनी म्हटले की, विकास लवांडे गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या गुरूंविरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करत होते. “ज्यांनी आम्हाला हिंदू धर्माची शिकवण दिली, त्या गुरुवर्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे निषेध म्हणून आम्ही त्यांच्यावर काळी शाई टाकली,” असे त्यांनी सांगितले. तसेच, “लवांडे यांनी पुन्हा आमच्या गुरूंबद्दल अपमानास्पद भाषा वापरली तर त्यांना पुढील परिणामांना सामोरे जावे लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला.

भंडारे यांनी लवांडेंनी केलेले पिस्तूल दाखवण्याचे आरोप फेटाळून लावत, “त्यांची एवढी पात्रताच नाही की त्यांच्यावर पिस्तूल रोखावे,” असे वक्तव्य केले. वारकरी संप्रदाय आणि गुरूंच्या सन्मानासाठीच हा निषेध केल्याचा दावा त्यांनी केला.

दरम्यान, विकास लवांडे यांनी या घटनेबाबत गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी सांगितले की, प्रवचन सेवा आटोपून परतत असताना काही गाड्यांनी त्यांचा रस्ता अडवला. त्यानंतर काही जणांनी त्यांना जबरदस्तीने खाली उतरवून स्मशानभूमीजवळ नेले. तिथे धक्काबुक्की करत रिव्हॉल्वर दाखवण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला.

लवांडे यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोरांनी त्यांना धमकावत अंगावर शाईच्या बाटल्या ओतल्या आणि “तुझा खात्मा करू” अशी धमकी दिली. या प्रकरणात संग्राम भंडारे आणि अक्षय कांचन यांना त्यांनी ओळखल्याचे सांगितले असून उर्वरित व्यक्ती अनोळखी असल्याचे त्यांनी नमूद केले.

तसेच, वारकरी संप्रदायाच्या नावाखाली काही वर्णवर्चस्ववादी आणि धर्मांध विचारांचे लोक सक्रिय असून, त्यांच्या भूमिकेमुळेच स्वतःवर हल्ला झाल्याचा आरोप लवांडेंनी केला आहे. सर्व आरोपींना अटक होईपर्यंत आपण पोलिस ठाण्यातून उठणार नसल्याचे सांगत त्यांनी सत्याग्रहाचा इशाराही दिला.


 Give Feedback



 जाहिराती