मुंबई : स्वगणना मोहिमेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यातील मूठ गावाने उल्लेखनीय कामगिरी करत राज्यात पहिले पूर्ण स्व-गणना करणारे गाव म्हणून मान पटकावला आहे.राज्यातील इतर गावांनीही मूठ गावाचा आदर्श घेऊन स्वगणना प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, असे आवाहन मुख्य प्रधान जनगणना अधिकारी निरुपमा जे डांगे यांनी केले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या गावातील सर्व कुटुंबांनी स्व-गणना प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण केली आहे. जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि स्थानिक प्रशासन व नागरिकांच्या सक्रिय सहभागातून हा महत्वपूर्ण टप्पा गाठण्यात यश आले.
मूठ गावात एकूण ३६ घरे आणि ४३ कुटुंबांचा समावेश असून गावाची लोकसंख्या १४४ आहे. गावातील सर्व कुटुंबांनी स्वगणना प्रक्रियेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवत माहिती अचूकपणे सादर केली.या यशामागे तहसीलदार ओंकार ओतारी यांचे सूक्ष्म नियोजन महत्त्वाचे ठरले. तसेच नायब तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि सर्व तलाठी यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे ही मोहीम वेळेत आणि प्रभावीपणे पूर्ण झाली. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत सहकार्याची भूमिका निभावली.मूठ गावाची ही कामगिरी जिल्ह्यासाठी प्रेरणादायी व राज्यासाठीही ठरली असून प्रशासन आणि नागरिक यांच्यातील प्रभावी समन्वयामुळे उद्दिष्ट यशस्वीरित्या साध्य होऊ शकते, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे.