पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड शहरातील एका उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटीत धक्कादायक घटना समोर आली आहे. सोसायटीच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एका सुरक्षा रक्षकाने चार अल्पवयीन मुलींना फूस लावून त्यांच्याशी गैरवर्तन करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी दुपारच्या सुमारास आरोपी दिनेश चौधरी याने १०, ८, ६ आणि ८ वर्षांच्या चार मुलींना “पाण्याची टाकी दाखवतो” असे सांगून सोसायटीच्या सातव्या मजल्यावरील टेरेसवर नेले. तिथे त्याने मुलींशी अश्लील वर्तन करत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही दिल्याचे समोर आले आहे.
घटनेनंतर मुली घाबरलेल्या अवस्थेत घरी परतल्या. मात्र, १० वर्षांच्या एका मुलीने धैर्य दाखवत संपूर्ण प्रकार आईला सांगितला. त्यानंतर पालकांनी तातडीने पोलिसांकडे धाव घेतली. माहिती मिळताच एमआयडीसी भोसरी पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून आरोपीला ताब्यात घेतले.
या प्रकरणाबाबत माहिती देताना पोलिस अधिकारी गणेश जामदार यांनी सांगितले की, संबंधित आरोपीचा सोसायटीतील कामाचा हा पहिलाच दिवस होता. यापूर्वी तो एका खासगी सिक्युरिटी एजन्सीत काम करत होता. आरोपीचे वय २५ वर्ष असून त्याच्याविरोधात विनयभंगासह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.