सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • NEET पेपरफुटीचं पुणे कनेक्शन, पुण्यातील ब्युटी पार्लर चालवणाऱ्या महिलेला अटक; सीबीआयकडे सोपवणार
  • पेट्रोल-डिझेल संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींचा मोठा निर्णय; स्वतःचा ताफा केला कमी, SPG लाही दिले महत्त्वाचे आदेश
  • सर्व परदेश दौरे रद्द करा, देवेंद्र फडणवीसांचे मंत्री आणि अधिकाऱ्यांना आदेश; राज्यातील मंत्र्यांच्या ताफ्यांचा आढावा घेतला जाणार
 शहर

हडपसरमधील उषाकिरण हॉस्पिटलमध्ये टायमर बॉम्बसदृश्य वस्तू; CCTV फुटेज समोर आल्यानंतर खळबळ

डिजिटल पुणे    14-05-2026 11:24:58

पुणे :  पुण्यातील हडपसर परिसरातील मुख्य बाजारपेठेत असलेल्या उषाकिरण हॉस्पिटलमध्ये गुरुवारी सायंकाळी टायमर बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेमुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पुणे पोलिसांच्या बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाने तात्काळ कारवाई करत संशयास्पद वस्तू सुरक्षितरीत्या निकामी केल्याने संभाव्य धोका टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, सायंकाळी सुमारे सातच्या सुमारास हॉस्पिटलच्या पहिल्या मजल्यावरील बाथरूममधील बेसिनखाली ही वस्तू ठेवण्यात आली होती. सीसीटीव्ही फुटेजमध्ये एक व्यक्ती इलेक्ट्रिक दुचाकीवरून येताना आणि बाथरूममध्ये संशयास्पद वस्तू ठेवताना दिसत असल्याची माहिती समोर आली आहे.

महिला कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे प्रकार उघड

बाथरूममध्ये काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांना चमकणारी संशयास्पद वस्तू दिसल्यानंतर त्यांनी तात्काळ हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. विलास गायकवाड यांना माहिती दिली. डॉ. गायकवाड यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता त्या वस्तूला चार जिलेटिन कांड्या, टायमर आणि वायर जोडलेली असल्याचे दिसून आले. टायमरवर 7.21 अशी वेळ सुरू असल्याचे त्यांनी पाहिले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डॉ. गायकवाड यांनी रुग्ण आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी धाडस दाखवत ती वस्तू काळजीपूर्वक उचलून एका बॉक्समध्ये ठेवली आणि हॉस्पिटलसमोरील मोकळ्या मैदानात हलवली. त्यानंतर तात्काळ पोलिसांना माहिती देण्यात आली.

बॉम्ब शोधक पथकाची तातडीची कारवाई

माहिती मिळताच बॉम्ब शोधक आणि नाशक पथक, तसेच वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. जवानांनी बॉम्ब सूट परिधान करून संशयास्पद वस्तू ताब्यात घेतली आणि ग्लायडिंग सेंटरच्या परिसरातील मोकळ्या मैदानात नेऊन नियंत्रित पद्धतीने निकामी केली.या घटनेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून संशयित व्यक्तीचा शोध सुरू आहे.

डॉ. विलास गायकवाड काय म्हणाले?

“सायंकाळी महिला कर्मचाऱ्यांनी संशयास्पद वस्तू दिसल्याची माहिती दिली. पाहणी केली असता त्या वस्तूला कांड्या, टायमर आणि वायर जोडलेल्या दिसल्या. हॉस्पिटलमध्ये अनेक रुग्ण उपचार घेत होते. त्यांच्या सुरक्षेचा विचार करून मी ती वस्तू बाहेर हलवली आणि पोलिसांना कळवले,” अशी माहिती डॉ. विलास गायकवाड यांनी दिली.


 Give Feedback



 जाहिराती