सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • सुरतजवळ दोन एसटी बसची समोरासमोर धडक; बसला आग लागून 7 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी
  • : लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या पुरुषांकडून सगळे पैसे वसूल करणार; देवेंद्र फडणवीस अ‍ॅक्शन मोडवर
  • मान्सूनपूर्व पावसाचा कहर! राज्यभर शेतीचे मोठे नुकसान; भिंत कोसळून मुलीचा मृत्यू, फळबागा उद्ध्वस्त
  • तुकाराम मुंढेनी एफडीएचा चार्ज घेताच भेसळखोरांवर आभाळ कोसळलं; दोन दिवसांत आणखी 40 छापे, पुणे आणि कोकणात मोठी कारवाई
  • देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा, म्हणाले, 'माझे नरेंद्र मोदी, अमित शाह यांच्यासोबत चांगले संबंध...'
 क्राईम

अधिक नफ्याच्या हव्यासातून मिथेनॉल मिसळली अन् 13 जणांचा बळी; पुण्यातील विषारी दारूकांडाची धक्कादायक कहाणी

डिजिटल पुणे    29-05-2026 18:25:16

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसराला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारूकांडामागील धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे. अधिक नफा कमावण्याच्या लालसेपोटी दारूमध्ये मिथेनॉल मिसळण्यात आल्याने ही दारू विषारी ठरली आणि आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झाला आहे. अनेकांची प्रकृती गंभीर असून परिसरात भीती आणि शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, उरळी कांचन परिसरातील राधेश्याम प्रजापती हा हातभट्टी दारू तयार करण्याचे काम करत होता. योगेश वानखेडे हा त्याच्याकडून मोठ्या प्रमाणात दारू खरेदी करून पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील विविध ठिकाणी विक्री करत होता. अधिक नफा मिळवण्यासाठी योगेशने दारूमध्ये मिथेनॉल मिसळल्याचा आरोप आहे. मिथेनॉलमुळे दारूचे प्रमाण वाढले, मात्र त्याचे प्रमाण जास्त झाल्याने ती दारू विषारी बनली आणि अनेकांच्या जीवावर बेतली.

ही विषारी दारू पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडी परिसरातील कर्नलसिंह विरखा आणि गुरमितसिंह विरखा या बापलेकांच्या गुत्त्यावर विकली गेली. याशिवाय खडकी परिसरातील कल्पेश अग्रवाल, वडारवाडीतील अरिहंत धोत्रे तसेच हडपसर आणि काळेपडळ भागातील आकाश जाधव आणि अशोक हांडे यांच्याकडेही हीच दारू पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या दारूच्या सेवनामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये 8 तर पुण्यात 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

या प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी सहा तर पुणे पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असून एकूण आठ जण पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींमध्ये योगेश वानखेडे, राधेश्याम प्रजापती, कर्नलसिंह विरखा, गुरमितसिंह विरखा, कल्पेश अग्रवाल, अरिहंत धोत्रे, आकाश जाधव आणि अशोक हांडे यांचा समावेश आहे.

दरम्यान, या घटनेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “ही घटना अत्यंत गंभीर असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल. या संपूर्ण रॅकेटमागील साखळी शोधून काढण्याचे काम सुरू आहे. हा प्रकार म्हणजे एक प्रकारची हत्या आहे,” असे त्यांनी म्हटले आहे.

विषारी दारू प्राशन केलेल्या अनेकांमध्ये एकसारखी लक्षणे दिसून आली. तोंडातून फेस येणे, अचानक बेशुद्ध पडणे आणि प्रकृती झपाट्याने खालावणे अशी लक्षणे आढळली. अकबर अजीम खान पठाण, राजेश राजपूत, आनंद निकाळजे आणि आनंद देसाई यांच्यासह अनेकांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया वायसीएम रुग्णालयात करण्यात आली.

या घटनेनंतर पुणे ग्रामीण पोलीस, पुणे शहर पोलीस आणि पिंपरी-चिंचवड पोलीस यांच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. स्थानिक नागरिकांच्या मते मृतांचा आकडा अधिक असण्याची शक्यता असून परिसरात अजूनही भीतीचे वातावरण कायम आहे.


 Give Feedback



 जाहिराती