पुणे : शहरातील वाढत्या गुन्हेगारीवरून खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेनंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नऊ पानांचे सविस्तर पत्र जारी करत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. पुणे शहर गुन्हेगारांची राजधानी बनत असल्याचा आरोप फेटाळून लावत त्यांनी अधिकृत आकडेवारीच्या आधारे गेल्या काही महिन्यांत गंभीर गुन्ह्यांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा केला आहे.
विषारी दारू प्रकरणानंतर सुप्रिया सुळे यांनी पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आयुक्तांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी केली होती. त्यास उत्तर देताना अमितेश कुमार यांनी विधायक टीकेचे स्वागत असल्याचे सांगितले, मात्र चुकीची किंवा दिशाभूल करणारी आकडेवारी समाजमाध्यमांवर प्रसारित झाल्यास नागरिकांमध्ये भीती आणि अविश्वास निर्माण होतो, असे नमूद केले.
आयुक्तांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी ते २७ मे २०२६ या कालावधीत पुण्यात सोनसाखळी चोरीत ५६ टक्के, लुटमार आणि जबरी चोरीत ३६ टक्के, वाहन चोरीत २८ टक्के, खुनाच्या प्रयत्नांच्या गुन्ह्यांत २७ टक्के आणि घरफोडीच्या घटनांत १४ टक्के घट झाली आहे. तसेच वाहन तोडफोडीच्या घटनांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक घट झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
राष्ट्रीय गुन्हे नोंद ब्युरोच्या आकडेवारीचा हवाला देत पुणे हे देशातील १९ प्रमुख महानगरांमध्ये दखलपात्र गुन्ह्यांच्या प्रमाणात १८व्या क्रमांकावर असून सुरक्षित शहरांपैकी एक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मागील दोन वर्षांत मकोका, एमपीडीए आणि तडीपार कारवाईद्वारे हजारो गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात आल्याचे पत्रात नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, मे २०२६ मध्ये अवघ्या दहा दिवसांत घडलेल्या काही गंभीर घटनांमुळे गुन्हेगारी वाढल्याची भावना निर्माण झाली होती, मात्र पोलिसांनी तातडीने अतिरिक्त गस्त आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू केल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले. तसेच बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर शहरात लॉकडाऊन लागू केल्याच्या अफवांचे खंडन करत परवानाधारक व्यावसायिकांवर कोणतेही निर्बंध नसल्याचेही त्यांनी सांगितले.पोलीस आयुक्तांच्या या पत्रानंतर खासदार सुप्रिया सुळे यांची पुढील भूमिका काय असेल, याकडे आता पुणेकरांचे लक्ष लागले आहे.