सुरत : गुजरातमधील सुरत जिल्ह्यात धुळे–सुरत महामार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बसांचा भीषण अपघात झाला. बार्डोली तालुक्यातील उवा आणि मानेकपोर गावांदरम्यान झालेल्या या अपघातानंतर एका बसने पलटी घेतली आणि त्यानंतर बसला आग लागल्याने सात प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.
प्राथमिक माहितीनुसार, धुळ्याकडून सुरतच्या दिशेने जाणारी एसटी बस आणि समोरून येणारी दुसरी एसटी बस यांची जोरदार समोरासमोर धडक झाली. धडकेची तीव्रता इतकी होती की एक बस रस्त्यावर उलटली. त्यानंतर बसमध्ये आग लागून काही प्रवासी अडकले.
घटनेची माहिती मिळताच बार्डोली अग्निशमन दल, पोलीस आणि रुग्णवाहिका तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. बचाव पथकांनी आग आटोक्यात आणत प्रवाशांना बाहेर काढले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
अपघातात मृत्यू झालेल्या सात जणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले असून मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, या दुर्घटनेमुळे धुळे–सुरत महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांकडून अपघाताचे नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.