सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, विदर्भाला 15 जूनपर्यंत प्रतीक्षा
 शहर

पावसाळ्यापूर्वी नागरी सुविधांची पाहणी; नगरसेवक पुनीत जोशी यांचा प्रशासनाला कामे तातडीने पूर्ण करण्याचा आदेश

गजानन मेनकुदळे    04-06-2026 15:40:53

पुणे : आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये यासाठी नगरसेवक श्री. पुनीत जोशी यांनी आपल्या प्रभागातील विविध भागांची प्रत्यक्ष पाहणी करून नागरी सुविधांचा आढावा घेतला. विनीत सोसायटी, राहुल नगर तसेच म्हात्रे पूल ते राजाराम पूल डी.पी. रस्त्यावरील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील विकासकामांची तपासणी करत संबंधित महापालिका अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या.

नगरसेवक पुनीत जोशी यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, ड्रेनेज व्यवस्था आणि पावसाळी चेंबर यांसारख्या मूलभूत सुविधांची पाहणी केली. नागरिकांनी मांडलेल्या विविध समस्या आणि तक्रारींची दखल घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश प्रशासनाला देण्यात आले. अनेक ठिकाणी कामांना जागेवरच सुरुवात करण्यात आली.

विनीत सोसायटी आणि राहुल नगर परिसरातील पाहणीदरम्यान पावसाळी चेंबर, कचरा व्यवस्थापन आणि नालेसफाईसंदर्भातील प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. नागरिकांच्या सूचनांनुसार समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित विभागांना तत्काळ उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी सर्व आवश्यक कामे पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला.

दरम्यान, म्हात्रे पूल ते राजाराम पूल या डी.पी. रस्त्यावरून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाकडे जाणाऱ्या मार्गावर सुरू असलेल्या रस्ते विकास आणि नाल्यावरील कल्वर्ट (छोटा पूल) बांधकामाचीही सविस्तर पाहणी करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी या कामांबाबत व्यक्त केलेल्या तक्रारी आणि सूचनांचा आढावा घेत दीनानाथ रुग्णालय प्रशासन तसेच मनपा अधिकाऱ्यांना आवश्यक सुधारणा करण्याबाबत जागेवरच निर्देश देण्यात आले.

पावसाळा तोंडावर असल्याने नालेसफाई आणि नाल्यात सुरू असलेल्या मलवाहिनीच्या कामाची विशेष तपासणी करण्यात आली. नागरिकांना पावसाळ्यात कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी सर्व प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याचे स्पष्ट आदेश देण्यात आले. तसेच पुढील आठवड्यात मलवाहिनीच्या कामाचा सविस्तर अहवाल सादर करून पुन्हा प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

यावेळी वकीलनगर परिसरातील ड्रेनेज व्यवस्थेचा प्रश्नही चर्चेत आला. या भागातील ड्रेनेज लाईन अद्याप मुख्य मलवाहिनीला जोडलेली नसल्यामुळे सांडपाणी साचण्याची गंभीर समस्या निर्माण होत आहे. या विषयावर मनपा अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा करून पावसाळ्यापूर्वी हे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याची आग्रही मागणी करण्यात आली.

या पाहणी दौऱ्यांमध्ये घनकचरा विभागाचे एस.आय. श्री. प्रशांत दामले व श्री. मोरे, पाणीपुरवठा विभागाच्या ज्युनिअर इंजिनिअर वैशाली मॅडम, ड्रेनेज विभागाच्या ज्युनिअर इंजिनिअर नीलाक्षी तडसे मॅडम, अभियंता अमोल साने, उपअभियंता विनायक शिंदे, नालेसफाई विभागाचे शुभम असवले, कनिष्ठ अभियंता रोहन दिवटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 

 

तसेच प्रभाग समिती अध्यक्षा सौ. मंजुश्रीताई खर्डेकर, नगरसेवक सुनिल पांडे, क्रिएटिव्ह फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर, दीनानाथ रुग्णालयाचे डॉ. योगेश भोपे, भाजपा प्रभाग अध्यक्षा ॲड. प्राची बगाटे, सरचिटणीस बाळासाहेब धनवे, सुयश गोडबोले, वैभव जमदाडे, मंडल उपाध्यक्षा अनघा जगताप, विनीत सोसायटीचे चेअरमन सुधीर थोरात, आशिष व्यास तसेच वकीलनगर, सुशीलानगरी, हिमाली संकुल, संजीवनी, राहुल नगर आणि इतर सोसायट्यांमधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना नगरसेवक पुनीत जोशी यांनी सांगितले की, नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष जाणून घेऊन त्यावर तातडीने उपाययोजना करणे हे आपले कर्तव्य आहे. पावसाळ्याच्या काळात नागरिकांना कोणतीही अडचण निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यात समन्वय ठेवून सर्व विकासकामे वेळेत पूर्ण केली जातील.

रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, सार्वजनिक सुविधा आणि नागरिकांच्या दैनंदिन समस्यांच्या निराकरणासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे नगरसेवक पुनीत जोशी यांनी आपल्या प्रभागातील विकासकामांना गती दिली असून नागरिकांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी सोडविण्याच्या कार्यपद्धतीमुळे त्यांच्याबद्दल नागरिकांमध्ये विश्वास आणि समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.


 Give Feedback



 जाहिराती