सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • केरळमध्ये मान्सूनचे आगमन; महाराष्ट्रात पुढील 48 तासांत पावसाची शक्यता, विदर्भाला 15 जूनपर्यंत प्रतीक्षा
 जिल्हा

भारती विद्यापीठ आयएमईडीला एएसीएसबीचे सदस्यत्व प्रदान

डिजिटल पुणे    04-06-2026 17:54:40

पुणे : भारती विद्यापीठ इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड आंत्रप्रुनरशिप डेव्हलपमेंट (आयएमईडी), पुणे यांना असोसिएशन टू अॅडव्हान्स कॉलेजिएट स्कूल्स ऑफ बिझनेस (एएसीएसबी) या जागतिक स्तरावरील प्रतिष्ठित संस्थेचे संस्थात्मक सदस्यत्व प्रदान करण्यात आले. यानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विशेष समारंभात मान्यवरांच्या उपस्थितीत सदस्यत्व प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले.भारती विद्यापीठाच्या एरंडवणे, पौड रस्ता येथील स्व. अभिजितदादा कदम सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला एएसीएसबी चे दक्षिण आशिया विभागप्रमुख डॉ.प्रताप दास, कुलगुरू डॉ. विवेक सावजी, बीव्ही हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, आयएमईडीचे संचालक डॉ. श्रवण कडवेकर, उपसंचालक डॉ.रामचंद्र महाडिक,डॉ.नेत्रा नीलम,डॉ.जी.जयकुमार,डॉ.अशोक जोशी,डॉ.अनिल केसकर  तसेच विविध शैक्षणिक संस्थांचे प्रमुख, प्राध्यापक, संशोधक, प्रशासकीय अधिकारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात एएसीएसबी इंटरनॅशनलचे दक्षिण आशिया विभागप्रमुख डॉ प्रताप दास यांनी “व्यवस्थापन शिक्षणातील जागतिक मानदंड : एएसीएसबी परिसंस्थेची ओळख” या विषयावर विशेष सत्र घेतले. त्यांनी एएसीएसबीच्या मानांकन प्रक्रियेची माहिती देताना व्यवस्थापन शिक्षणातील आंतरराष्ट्रीय गुणवत्ता निकष, उत्कृष्ट अध्यापन पद्धती, संशोधनाभिमुखता, उद्योग-संलग्नता आणि जागतिक स्पर्धात्मकता वाढविण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर सविस्तर मार्गदर्शन केले.डॉ. प्रताप दास यांनी जागतिक शिक्षण क्षेत्रातील उदयोन्मुख मानदंडांवर सविस्तर प्रकाश टाकला. संस्थात्मक गुणवत्ता, आंतरराष्ट्रीय स्तरावरील दृश्यमानता आणि विविध हितधारकांचा विश्वास वाढविण्यासाठी एएसीएसबी मानांकनाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. आयएमईडीच्या क्षमतांबद्दल विश्वास व्यक्त करताना त्यांनी सांगितले की, जागतिक स्तरावर मान्यता प्राप्त बिझनेस स्कूल्सच्या श्रेणीत स्थान मिळविण्याची क्षमता या संस्थेमध्ये आहे.

एएसीएसबी मानांकनाच्या फायद्यांविषयी बोलताना डॉ. दास यांनी सांगितले की, मानांकनप्राप्त संस्थांमधील विद्यार्थ्यांना उद्योग क्षेत्रात अधिक मान्यता मिळते तसेच रोजगाराच्या संधीही वाढतात. अनेक नामांकित बहुराष्ट्रीय कंपन्या भरती प्रक्रियेदरम्यान एएसीएसबी मानांकनाला महत्त्वपूर्ण गुणवत्ता निकष मानतात, असे त्यांनी नमूद केले. तसेच प्राध्यापकांना वाढीव विद्यार्थी प्रवेश, आंतरराष्ट्रीय संशोधन सहकार्याच्या संधी, उद्योजकता विकास उपक्रम आणि विविध निधी उपलब्ध होण्याच्या संधी यांचा लाभ मिळतो, असेही त्यांनी सांगितले. त्यांच्या मते, एएसीएसबी मानांकनामुळे विद्यार्थी, प्राध्यापक, उद्योग क्षेत्र आणि शासन या चार प्रमुख घटकांसाठी मूल्यनिर्मिती होते आणि जागतिक शैक्षणिक मानकांशी सुसंगतता अधिक दृढ होते.संस्थेच्या मानांकन प्रवासाविषयी बोलताना डॉ. दास यांनी नमूद केले की, एएसीएसबी मानांकन प्रक्रियेत सहभागी होऊन आयएमईडीने पहिला महत्त्वपूर्ण टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. आगामी काळात संस्था ही कठोर आणि व्यापक मानांकन प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना भारती विद्यापीठ हेल्थ सायन्सेसच्या कार्यकारी संचालिका डॉ.अस्मिता जगताप यांनी अल्पावधीत हा महत्त्वपूर्ण टप्पा गाठल्याबद्दल आयएमईडीच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले. व्यवस्थापन शिक्षणात जागतिक दर्जाची मानके प्राप्त करण्यासाठी संस्थेची बांधिलकी कायम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी यांनी या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, एएसीएसबीच्या प्रवासामुळे शैक्षणिक उत्कृष्टता, जागतिक मान्यता, आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि संस्थात्मक विकासासाठी नवीन संधी उपलब्ध होतील.आयएमईडीचे संचालक डॉ. श्रवण कडवेकर यांनी सांगितले की, हा समारंभ व्यवस्थापन शिक्षणातील जागतिक दर्जाच्या मानकांच्या दिशेने आयएमईडीच्या वाटचालीतील एक महत्त्वाचा टप्पा आहे. तसेच शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी आयुष्यभर कार्यरत राहिलेल्या पद्मविभूषण डॉ. पतंगराव कदम यांच्या दूरदर्शी विचारांना आणि प्रेरणादायी वारशालाही या निमित्ताने अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या शेवटी आयएमईडीचे उपसंचालक डॉ. रामचंद्र महाडिक यांनी आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला विविध शैक्षणिक संस्थांतील नामवंत शिक्षणतज्ज्ञ, प्रशासकीय अधिकारी, प्राध्यापक, विद्यार्थी आणि प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते. गुणवत्ता वृद्धी, आंतरराष्ट्रीय मानांकन चौकट आणि भारतातील व्यवस्थापन शिक्षणाचे भविष्य या विषयांवर चर्चा करण्यासाठी हा कार्यक्रम एक प्रभावी व्यासपीठ ठरला.


 Give Feedback



 जाहिराती