पुणे : पुण्यातील हिंजवडी परिसरात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) मध्ये कार्यरत असलेल्या ४८ वर्षीय कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये कंपनीतील काही सहकाऱ्यांकडून होत असलेल्या मानसिक छळाचा उल्लेख करण्यात आल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. या प्रकरणी पोलिसांनी तिघांविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, संबंधित कर्मचारी काही दिवसांपासून मानसिक तणावाखाली होता. सुसाईड नोटमध्ये कामाच्या ठिकाणी सातत्याने अपमानास्पद वागणूक, मानसिक दबाव आणि छळ सहन करावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या नोटच्या आधारे पोलिसांनी संबंधित व्यक्तींची चौकशी सुरू केली असून, आरोपींमध्ये दोन महिला कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सुसाईड नोट, इलेक्ट्रॉनिक पुरावे आणि संबंधित व्यक्तींचे जबाब यांच्या आधारे तपास सुरू असून, सर्व पैलूंची सखोल चौकशी केली जात आहे.
या घटनेमुळे आयटी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरील मानसिक ताण, कार्यस्थळी होणारा छळ आणि कर्मचाऱ्यांच्या मानसिक आरोग्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सुरक्षित आणि सकारात्मक कार्यसंस्कृती निर्माण करण्यासाठी प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा आणि मानसिक आरोग्य सहाय्य व्यवस्था अधिक सक्षम करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या प्रकरणावर TCS कडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. कंपनीच्या अधिकृत भूमिकेची प्रतीक्षा असून, प्रतिक्रिया प्राप्त झाल्यानंतर या वृत्तात आवश्यक ती भर घालण्यात येईल.