बुलढाणा : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्यभर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्यपदार्थांविरोधात विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अचानक छापा टाकला.
निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कारवाईत कचोरी तयार करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त करण्यात आले. शेगावमध्ये दर्शनासाठी येणारे लाखो भाविक या कचोरीचा आस्वाद घेत असल्याने अन्नाच्या गुणवत्तेबाबत प्रशासनाने विशेष दक्षता घेतली आहे. प्रयोगशाळेच्या अहवालात नमुन्यांमध्ये भेसळ अथवा मानकांचे उल्लंघन आढळल्यास संबंधित आस्थापनाविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.
मुलुंडमध्येही एफडीएची मोठी कारवाई
दरम्यान, मुंबईतील मुलुंड परिसरातही अन्न व औषध प्रशासनाने मोठी कारवाई केली. 'गुप्ता चणा भंडार' या आस्थापनाची तपासणी केली असता गंभीर अस्वच्छता, तसेच कायदेशीर लेबलविना अन्नपदार्थ विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे निदर्शनास आले.
तपासणीदरम्यान पाणीपुरी सुखी, बारीक शेव, शेवपुरी सुखी, भाजलेले चणे, मुरमुरे आणि संशयास्पद रंगयुक्त हिरवे वाटाणे आदी एकूण ११४.२ किलो अन्नसाठा जप्त करण्यात आला. या जप्त मालाची अंदाजे किंमत ८ हजार २९० रुपये असल्याचे सांगण्यात आले आहे. संबंधित व्यावसायिकास व्यवसाय बंद करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत.
'मेडिकल म्हणजे किराणा दुकान नाही'
दुसरीकडे, औषध वितरणाबाबतही नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची मागणी जोर धरत आहे. कोणत्याही मेडिकल दुकानात केवळ नोंदणीकृत फार्मासिस्टमार्फतच औषध वितरण केले जावे, अशी मागणी इंडियन फार्मासिस्ट असोसिएशनने आयुक्त तुकाराम मुंडे यांच्याकडे केली आहे.
मेडिकल परवान्यांचा गैरवापर, लायसन्स भाड्याने देण्याचे प्रकार आणि अपात्र व्यक्तींकडून औषध विक्री होत असल्याच्या तक्रारी वाढत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. रुग्णांच्या सुरक्षिततेसाठी औषधांविषयी आवश्यक ज्ञान असलेल्या पात्र फार्मासिस्टकडूनच औषध वितरण होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राज्यभर सुरू असलेल्या या मोहिमेमुळे अन्न व औषधांच्या गुणवत्तेबाबत नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली असून, सर्वसामान्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने प्रशासनाचा हा पुढाकार महत्त्वाचा मानला जात आहे.