सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   मराठी | English  
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  मराठी | English  
 ब्रेकिंग न्यूज:
  • मोठी बातमी: आता 180 ऐवजी 195 मिनिटांचा पेपर; 21 जूनच्या परीक्षेसाठी 'NTA'कडून वाढवला वेळ, रफ कामाची पानेही वाढवली
 शहर

फातिमा नगर चौकातील बंद सबवे तात्काळ सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडू – सचिन भोसले

डिजीटल पुणे    12-06-2026 17:13:08

पुणे : पुणे पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांच्याकडे फातिमा नगर चौकातील पादचाऱ्यांच्या सुरक्षेबाबत गंभीर तक्रारी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी स्वतः घटनास्थळी जाऊन पाहणी केली. पाहणीदरम्यान प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांना जीव धोक्यात घालून रस्ता ओलांडावा लागत असल्याचे वास्तव समोर आले.

पुणे वाहतूक पोलिसांनी सोलापूर रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी फातिमा नगर चौक सिग्नलमुक्त केला आहे. त्यामुळे वाहनांची वाहतूक वेगाने सुरू झाली असली तरी पादचारी नागरिक, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. चौक सिग्नलमुक्त करण्यापूर्वी नागरिकांना सुरक्षितपणे रस्ता कसा ओलांडता येईल याचा कोणताही विचार करण्यात आलेला दिसत नाही.

या ठिकाणी आधीपासूनच भुयारी पादचारी मार्ग (सबवे) उपलब्ध आहे. मात्र सद्यस्थितीत त्या सबवेच्या दोन्ही बाजूंना शटर लावून तो बंद ठेवण्यात आला आहे. सबवेमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा, प्लास्टिकच्या पिशव्या, दारूच्या बाटल्या, हॉटेलमधील उरलेला कचरा, कपडे, पोती आणि इतर घाण साचलेली असून त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांना त्या मार्गाचा वापर करणे अशक्य झाले आहे.

सचिन भोसले यांनी स्वतः रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला असता भरधाव वाहनांमुळे नागरिकांना जीव मुठीत धरून रस्ता पार करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. यावेळी अनेक ज्येष्ठ महिला व नागरिक मोठ्या धोक्याने रस्ता ओलांडताना दिसून आले. भविष्यात या ठिकाणी एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

पुणे महानगरपालिका आणि पुणे वाहतूक पोलिसांनी नागरिकांच्या सुरक्षेचा विचार करून फातिमा नगर चौकातील सबवे तात्काळ स्वच्छ करावा, आवश्यक दुरुस्ती करावी आणि नागरिकांसाठी खुला करावा. तसेच सबवेमध्ये कायमस्वरूपी प्रकाश व्यवस्था (लाईट), सीसीटीव्ही कॅमेरे आणि आवश्यक असल्यास सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात यावी. महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे.

फक्त वाहतूक सुरळीत करण्यासाठी चौक सिग्नलमुक्त करून चालणार नाही, तर नागरिकांच्या जीवित सुरक्षेलाही तितकेच महत्त्व देणे आवश्यक आहे. त्यामुळे फातिमा नगर चौकातील बंद सबवे तात्काळ सुरू करून सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी पुणे पॅंथर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सचिन भोसले यांनी केली आहे. अन्यथा पुणे पॅंथर संघटनेच्या वतीने तीव्र लोकआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

 


 Give Feedback



 जाहिराती