सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

सृष्टी कथन (भाग ३)

डिजिटल पुणे    20-01-2024 18:06:48

सृष्टी कथन (भाग ३)

येके कल्पनेचे पोटी | होति जाती अनंत सृष्टी | तया सृष्टींची गोष्टी | साव केवी ||६/६/३१||

मी एक आहे म्हणून मी अनेक व्हावा अशी परमात्म्याने कल्पना केली आणि अनंत प्रकारे सृष्टी होत गेली. सगळा कल्पनेचाच खेळ असल्याने निर्माण झालेल्या सृष्टीला खरेपणा असणे शक्य नाही.अज्ञानी माणसे कल्पनेने सगुण देवाला आकार देतात. त्याच्या ठिकाणी श्रद्धा ठेवतात. पण चुकून त्या मूर्तीला काही झाले तर दु:खी होतात. दगडाची मूर्ती बनवली आणि चुकून ती भंगली तर भक्त जमिनीवर कोसळून आक्रोश करून रडू लागतो. कधी हा कल्पनेने आकार दिलेला देव घरीच हरवतो, चोर चोरून नेतो, मूर्तीभंजक जमात मूर्ती फोडतात, भ्रष्ट करतात, पाण्यात फेकून देतात, पायाखाली तुडवतात, त्या देवाची तीर्थस्थाने उध्वस्त करतात. तेव्हा लोक आपसात चर्चा करतात की अहो, त्या तीर्थाची महिमा काय सांगावी ! पण दुष्टांनी त्याला नष्ट केले हो ! देव जागृत होता पण त्याचे बळ कुठे गेले काही कळेना !

एक देव सोनार घडवतो, ओतारी मुशीत अनेक धातूचे मिश्रण ओतून एक देव घडवतो, पाथरवट दगडातून देव घडवतो शिवाय नर्मदा व नेपाळमधील गंडकी नदी यात तर लक्षावधी देव पडून आहेत, त्या दगडांना मोजणे शक्य नाही. तिथला कंकर कंकर शंकर आहे असे लोक म्हणतात. चक्रतीर्थात चक्राचे चिन्ह असलेले असंख्य देव पडून आहेत, ज्याला आपण शाळीग्राम म्हणतो. खरा देव एकच आहे असे काही मन मानत नाही. बाण, तांदळे, तांब्याची नाणी, स्फटिक यांचे देव बनवून देवाऱ्ह्यात पूजले जातात. असले देव खरे की खोटे कोण जाणे !

एकाने रेशमाचा देव केला पण तो तुटल्याने मातीचा घडवून त्याचा नेम धरला. काही लोक म्हणतात की आमचा देव खरा आहे आमच्या संकटात पावतो, आमचे मनोरथ पूर्ण करतो. पण आता त्याचे सत्व नाहीसे झाले आहे, तो शक्तीहीन झाला आहे, म्हणून आमच्या नशिबात होते ते झाले. जे घडणार ते ईश्वरालाही बदलता येणार नाही. अशा अनेक कल्पना करणाऱ्या लोकांना समर्थ विचारतात की अरे मुर्खा ! धातू, दगड, माती, चित्रे, लाकूड यात देव कसा असेल ? त्यात देव आहे असे वाटणे हा केवळ भ्रम आहे. ही आपलीच कल्पना आहे. आपल्या कर्मानुसार आपल्याला सुखदु:खे भोगावी लागतात. खरा देव ओळखण्याच्या खुणा वेगळ्याच असतात.

 हा सगळा मायेचा चक्कर आहे. सगळे दृश्य जग कोटीगुणे मिथ्या (मिथक) आहे. सर्व वेद, शास्त्र, पुराण, सर्व संत हेच सांगतात. खरा देव पंच महाभूतांच्या पल्याड आहे आणि ही सृष्टी मिथ्या आहे. (म्हणजेच कल्पना आहे. जे दिसते, खरे वाटते पण सत्याचे ज्ञान झाल्यावर नाहीच असे कळते त्यास मिथ्या असे म्हणतात.)सृष्टीच्या आरंभी, मध्ये आणि अंती खरा देव जसा आहे तसाच राहतो. या दृश्य सृष्टीत आत्मस्वरूप भरलेले आहे असा विचार करणे यास अन्वय म्हणतात आणि जे जे दृश्य आहे, कल्पनेत येते, मनाला भासते, बुद्धीने ग्रहण होऊ शकते, ते सगळे अनात्म असल्याने त्याचा निरास करून जे केवल स्वरूपाने शिल्लक उरते ते आत्मस्वरूप समजावे. अशा विचार करणे यास व्यतिरेक म्हणतात.

कल्पना आठ प्रकारची सृष्टी निर्माण करते – १.कल्पनेची सृष्टी २.शब्द सृष्टी ३.प्रत्यक्ष सृष्टी ४.चित्रलेप सृष्टी - कागद, कापड, लाकूड व भिंत यावर रंगकाम करून केलेली सृष्टी ५.स्वप्न सृष्टी ६.गंधर्व सृष्टी- आकाशात दिसणारे विविध देखावे ७.ज्वर सृष्टी – ज्वर-ताप वाढल्याने होणारा भ्रम ८.नजरबंदी मुळे दिसणारी सृष्टीही सृष्टी नाशिवंत असली तरीही श्रीसमर्थ सांगतात की खऱ्या देवाचा अनुभव येण्यासाठी सगुणाचे भजनपूजन आवश्यक आहे. आपण मनाच्या स्तरावर जगणारे असल्याने मनाला काही धारणा द्यावी लागते. तरच ते एकाठिकाणी स्थिर होईल. सगुण भजनाने देहाचा विसर पडला की मग निर्गुणाची धारणा करणे सोपे जाते. म्हणून मिथ्या सगुणाची उपासना करावी लागते. सगुण उपासना, सारासार विचार व सत्संगती या त्रयीच्या आधाराने साधक आत्मज्ञानी होतो.

 

सगुणाचेनि आधारे | निर्गुण पाविजे निर्धारे | सारासारविचारे | संतसंगे ||६/६/५५||

कथाव्यास- दामोदर प्र. रामदासी, पुणे (नवगणराजुरी रामदासी मठ परंपरा, जि. बीड)

योद्धा संन्यासी स्वामी विवेकानंद, आद्य शङ्कराचार्य आणि राष्ट्रगुरू समर्थ रामदासस्वामी या एकपात्री नाटकाचे राष्ट्रीय कलाकार/नाटककार

९५८८४३२५८४, ९८५०११९४७४

 


 तुमची प्रतिक्रिया



 संबंधित बातम्या
 जाहिराती
 जाहिराती