सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 विश्लेषण

ठाण्यात चैत्र नवरात्र देवी विसर्जन सोहळा उत्साहात संपन्न ; मुख्यमंत्री सहकुटुंब मिरवणुकीत झाले सहभागी

डिजिटल पुणे    19-04-2024 16:02:33

ठाणे : गुढी पाडव्यापासून सुरु झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्यादिवशी झाल्यानंतर गुरुवारी देवीचे उत्साहात विसर्जन करण्यात आले. कोपरीतील श्री धर्मवीर आनंद दिघे प्रतिष्ठानच्यावतीने आयोजित केलेल्या या नवरात्रोत्सवातील देवीचे विसर्जन श्री अंबे मातेचा जयघोष करीत ढोल ताशाच्या गजरात भव्य शोभायात्रा काढून करण्यात आले. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते. यावेळी मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती होती.ठाणे पुर्वेकडील कोपरी, येथील संत तुकाराम महराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्यावतीने श्री अंबे मॉ चैत्र नवरात्रौत्सवाचे आयोजन गेले दहा दिवस करण्यात आले होते.

गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते वेद मंत्रांच्या घोषात पुजा अर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवकुंडात्मक सहस्त्रचंडी याग सभोवती १०८ प्रदक्षिणा घातल्या. याप्रसंगी, मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे,नातु रुद्रांश यांच्यासह अनेक मान्यवर तसेच भाविक मंडळी उपस्थित होते. देवीच्या महाआरती नंतर विसर्जनाच्या मिरवणुक सोहळ्याला प्रारंभ झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब देवीचा रथ ओढत होते. यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या विणा भाटीया यादेखील आवर्जुन उपस्थित होत्या. ढोल-ताशांच्या गजरात, विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री अंबे मातेचा गजर करीत कोपरीतील भाजी मार्केट, बारा बंगला येथुन नौपाडा, राममारूती रोड मार्गे मिरवणुक मार्गस्थ झाली. तेथुन मध्यरात्रीनंतर तलावपाळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधीवत विसर्जन करण्यात आले. तलावात तीन प्रदक्षिणा घालुन विसर्जन सोहळा पार पडला. यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती