सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 विश्लेषण

मोठी बातमी!! लोकसभा निवडणुकीतून छगन भुजबळांनी घेतली माघार; दिले ”हे’ कारण

डिजिटल पुणे    19-04-2024 18:43:59

मुंबई : आज देशामध्ये पहिल्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली आहे. परंतु अजूनही महायुतीत जागा वाटपाचा तिढा सुटलेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवरच नेते छगन भुजबळ  यांनी एक मोठी घोषणा केली आहे. आज मुंबईत पत्रकार परिषद घेत छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली आहे. मुंबईतील पत्रकार परिषदेत स्वतः भुजबळ यांनी याबाबत घोषणा केली आहे. यावेळी त्यांनी, नाशिकमधून मी माघार घेत असल्याची माहिती सर्वांना दिली आहे.

पत्रकार परिषदेत बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, “आम्ही नाशिकच्या जागेविषयी मागणी केली होती. समीर भुजबळांसाठी जागा मागितली होती. मात्र, अमित शहा म्हणाले तुम्ही असाल तरच ठीक आहे. देवेंद्र फडणवीस यांनीही तेच सांगितलं. गृहमंत्री अमित शहांनी माझ्यावर विश्वास दाखवून माझ्या नावाची शिफारस केल्याने मी त्यांचे धन्यवाद मानतो. माझे नाव चर्चेत आल्यानंतर सर्वच समाजातील बांधवांनी मला सपोर्ट केला. मराठा बांधवांनीही माझ्या नावाचे स्वागत केले. त्या सगळ्यांचे आभार मानतो”

त्याचबरोबर, “होळीच्या दिवशी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मला देवगिरी बंगल्यावर बोलावून घेतलं होतं. त्यावेळी खासदार प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेदेखील तिथे उपस्थित होते. त्यांनी मला दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक झाली असल्याचे सांगितले. तसेच या बैठकीत नाशिकचा मतदारसंघ आपल्याला मिळाला असून तुम्ही याठिकाणी उमेदवारीची तयारी करा, असे आदेशच अजित पवार यांनी मला दिले” अशी माहिती छगन भुजबळ यांनी दिली.

माघार का घेतली?

दरम्यान, “लोकसभा निवडणुकीसाठी माझ्या नावाची चर्चा सुरू झाल्यापासून मराठा समाज, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्याक विविध घटकांनी मला पाठिंबा दिला आहे. आतापर्यंत पक्षाने नाशिकची जागा जाहीर करायला हवी होती. परंतु अजूनही ती जाहीर करण्यात आलेली नाही. त्यामुळेच मी नाशिकच्या उमेदवारीवरून माघारी घेत आहे.” असे कारण छगन भुजबळ यांच्याकडून देण्यात आले आहे.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती