सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 पूर्ण तपशील

पौरोहित्यासाठी संस्कृत आवश्यकच नव्हे तर अनिवार्य

MSK    02-05-2024 10:12:02

पौरोहित्यासाठी संस्कृत आवश्यकच नव्हे तर अनिवार्य

‘संस्कार’ ही संस्कृत भाषेची सर्वात मोठी देणगी. बालपणापासून आपल्यावर जे धार्मिक संस्कार कळत-नकळत रुजवले जातात त्याचे स्वरूप किंवा तीव्रता कमी अधिक असली तरी अनिवार्यता खरंच आश्चर्यकारक असते. देवपूजा म्हणजे काय ? ह्याचे आपल्याला ज्ञान नसते.  तरीही, केवळ गुरुजनांचा आग्रह म्हणून देवापुढे  नतमस्तक होणे हे आपले नित्यनेमाचे कर्म होऊन जाते.  घरातले धार्मिकतेचे वातावरण कमी-अधिक स्वरूपातले असले तरी सत्यनारायण, गणेशपूजन, वास्तुशांत ह्या आजच्या पिढीच्याही अंगवळणी पडलेल्या काही प्रथा.   गुरुजींनी यजमानाच्या घरी जाऊन सर्व विधी यथासांग पार पाडावेत हा अलिखित नियम.

पुरोहित या शब्दाचा अर्थ पुरः – अग्रभागी, हित – स्थापित. ह्याला पुरोधा असेही म्हणतात. धार्मिक बाबतीत साहाय्य करणारा मुख्य ब्रह्म म्हणजे 'पुरोहित'.  बृहस्पती हा देवांचा पुरोहित होता असा उल्लेख वेदांमधे आढळतो.  कसा असावा हा पुरोहित ? कौटिल्य म्हणतो की पुरोहित हा विख्यात, कुलशीलाचा, षडंगासहित वेद, नैमित्तिक कर्मे आणि शास्त्र ह्यात कुशल असावा.  दैवी व मनुष्यकृत आपत्तींचा अथर्व वेदातील मंत्रांनी व व्यावहारिक युक्तींनी प्रतिकार करणारा असावा.   पुरोहित हा संस्कृतभाषा उत्तमपणे जाणणारा असावा.  

वेद, पुराण, ब्राह्मणग्रंथ यांच्या आधाराने मंत्रोच्चार करणारा पुरोहित हा ‘अर्थेषु मूढाः खरवत् वहन्ति’ असा नसावा. अर्थ व शास्त्राच्या बरोबरीने त्याला संस्कृत उच्चारांचेही उत्तम ज्ञान असावे.  मंत्रांचा मनुष्यजीवनावर होणारा परिणाम अभूतपूर्व असला तरी तो सामान्य लोकांना माहीत नसतो.  घरात धार्मिक कृत्य करत असताना, पुरोहिताकडून उच्चारल्या गेलेल्या मंत्रांचा प्रभाव पडावा असे जर वाटत असेल  तर पुरोहिताचे संस्कृतचे उच्चार योग्य हवेत.   तसेच मंत्रातील उदात्त व अनुदात्त स्वरांचे शास्त्रोक्त पठण व्हावयास हवे.  जर यजमानाचे मुख्य उद्दिष्ट सफल होणे अपेक्षित असेल तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही पुरोहिताचीच मानली जाते.  

काही विशिष्ट गुरुपरंपरेमधे शिकलेले सर्व पुरोहित रोजच्या रोज अनेक देवतांना उद्देशून ‘आयुःकर्त्र्याः’, ‘क्षेत्रकर्त्र्याः’ ‘शान्तिकर्त्र्याः’ ‘निर्विघ्नकर्त्र्याः’ असे बिनधास्तपणे उच्चारत असतात व तेच योग्य आहे  असे त्याचे प्रतिपादन असते.  शेवटी, जर कोणतेही धार्मिक कार्य करताना त्यात देवतेशी संवाद असतो असे गृहीत धरले तर तो संवाद अर्थपूर्णच असायला हवा.  संवाद अर्थपूर्ण होण्यासाठी मंत्रोच्चार योग्य पद्धतीने व्हायला हवेतच पण त्याबरोबरच केल्या जाणा-या कृतीमधील संस्कृत पदेही अचूकपणे वापरावयास हवीत. तरच त्याचा अपेक्षित अर्थबोध देवतेला होऊन योग्य व उत्तम फलप्राप्ती होते.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती