सामाजिक जगतातील प्रेरणापत्र   न्यूज़ रिपोर्टर 
सामाजिक जगतातील प्रेरणापत्र  न्यूज़ रिपोर्टर
 शहर

मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांना बहुमताने विजयी करा बीएसपीचे आवाहन

डिजिटल पुणे    09-05-2024 17:04:59

पिंपरी:   मागील दहा वर्षांपासून केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे. या काळात भारतीय संविधान अक्षरशः  पायदळी तुडवले आहे. या भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी आणि उपेक्षित समाज घटकांना न्याय देऊन सत्तेत सहभागी करून घेण्यासाठी बहुजन समाज पार्टीचे संस्थापक अध्यक्ष काशीरामजी यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून राष्ट्रीय अध्यक्ष बहन मायावतीजी यांच्या नेतृत्वाखाली लढा उभारून बीएसपीचे आम्ही सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी लोकसभा निवडणुकींना सामोरे जात आहे. मायावतीजी यांना पंतप्रधान करण्यासाठी मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांच्या हत्ती चिन्ह समोरील बटन दाबून बहुमताने विजयी करा. मावळ लोकसभा मतदारसंघातील राजाराम पाटील गेम चेंजर ठरतील असा विश्वास बीएसपीचे प्रदेश महासचिव आणि पश्चिम महाराष्ट्र झोन प्रभारी हुलगेश चलवादी यांनी केले. 

बुधवारी (दि. ८ मे २०२४) पिंपरी येथे बहुजन समाज पार्टीच्या (बीएसपी)  वतीने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत हुलगेश चलवादी बोलत होते. यावेळी मावळ लोकसभेचे बीएसपीचे अधिकृत उमेदवार राजाराम पाटील, बीएसपीचे पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड, मावळ लोकसभा प्रभारी सागर जगताप, मावळ लोकसभा अध्यक्ष प्रकाश गायकवाड, पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष सुशील गवळी आदी उपस्थित होते.

   चलवादी म्हणाले की, बीएसपीचा लढा प्रस्थापित व्यवस्थेविरुद्ध आहे. महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी निर्मिलेल्या संविधानाची रक्षा करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. तेव्हा भारतीय संविधानाच्या रक्षणासाठी बहुजन समाज पार्टीला सत्तेत आणणे गरजेचे आहे. देशभरात शिक्षण हक्क कायदा राबवण्यासाठी भाजपा सह काँग्रेसही अपयशी ठरलेले आहे. केजी टू पीएचडी शिक्षण मोफत दिले पाहिजे. ओबीसी, मागासवर्गीय अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली पाहिजे. मागील दहा वर्षात बेरोजगारी मध्ये राष्ट्रीय पातळीवर ४० टक्के पेक्षा जास्त वाढ झाली आहे. त्यामुळे बेरोजगारीला समूळ संपवण्यासाठी शेती व शेतीपूरक व्यवसायांना पूरक धोरणे आणली पाहिजेत.

ग्रामीण भागात शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध करून दिल्यास ग्रामीण भागातील बेरोजगार युवक शहराकडे येणार नाही. तर त्याच्या स्थानिक ठिकाणीच त्याला रोजगार दिला पाहिजे, रोजगार निर्मितीसाठी बीएसपी काम करेल. लोकसंख्येनुसार शासकीय, निमशासकीय नोकरीमध्ये वाढ होणे अपेक्षित असताना हे सरकार शासकीय नोकऱ्यांचा अनुशेष भरून काढत नाही. उलट आरक्षित जागा आवर्जून प्रलंबित ठेवल्या जात आहेत. त्यामुळे या सरकार विषयी व सरकारच्या आरक्षणाच्या भूमिकेविषयी नागरिकांमध्ये विशेषतः युवकांमध्ये तीव्र रोष आहे. शासकीय, निमशासकीय नोकऱ्यांचा अनुशेष भरून काढून लोकसंख्येच्या निर्देशांकानुसार जागा निर्माण करण्याचे धोरण बीएसपीचे आहे. जम्मू काश्मीर व ईशान्य भारतातील राज्यांसह भाजपाच्या काळात विविध धर्मांमध्ये तेढ वाढली आहे.

राष्ट्राची एकसंधता आणि प्रगती त्यामुळे धोक्यात आली आहे. म्हणूनच सर्व धर्मांमध्ये सलोखा आणि एकोपा निर्माण करण्यासाठी बहुजन समाज पार्टीला सत्ता द्या. इडी, आयटी, सीबीआय या केंद्रीय प्रशासकीय संस्थांना हाताशी धरून, आपल्या विरोधी पक्षांना खोट्या आरोपांमध्ये अडकवण्याचे काम भाजप करीत आहे. 'नोटबंदी' मुळे अर्थव्यवस्थेवर अतिशय वाईट परिणाम झाला. लघुउद्योजक उध्वस्त झाले. भाजपच्या काळात शेतकर्‍यांच्या आत्महत्त्या प्रचंड वाढल्या आहेत. या निर्दयी सरकारला पायउतार केले पाहिजे. भाजपने माध्यमांना वेठीला धरले आहे आणि स्वतःला अनुकूल अश्या बातम्या पसरविण्याचा उद्योग ते करत आहेत असेही चलवादी म्हणाले.

बीएसपी चे मावळ लोकसभेचे उमेदवार राजाराम पाटील यांनी सांगितले की, अल्पसंख्यांक आणि विशेषतः दलितांवरील अत्याचार भाजप शासनकाळात लक्षणीयरित्या वाढले आहेत.  महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा निळा झेंडा व हत्ती हे चिन्ह घेऊन बसपा लोकसभेच्या निवडणुकीत सर्व शक्तीनिशी उतरला आहे. संसदेत कोणतीही चर्चा न करता अध्यादेशांद्वारे राज्य करण्यास प्राधान्य देणाऱ्या या केंद्र सरकारने संसदेचा अवमान केला आहे. तेव्हा संसदेचा सन्मान वाढवण्यासाठी बहन मायावतींच्या बहुजन समाज पार्टीला बहुमताने विजय करण्याचा निर्धार मावळ सह देशभरातील सुज्ञ मतदारांनी केला आहे. 

एसआरए प्रकल्पासाठी स्वयम विकासाचा पर्याय निवडण्याची मुभा झोपडपट्टीधारकांना दिली पाहिजे. मावळ लोकसभेतील कोळी, आगरी, भंडारी, भटके विमुक्त जाती, ओबीसी, एससी, एसटी समाजावर दोन्ही शिवसेनेने, भाजपने, काँग्रेसने आजपर्यंत अन्याय केला आहे. पेशवाई सारखे आताचे आमदार, खासदार प्रतिनिधित्व करत आहेत. कुलाबातील कोळीवाडा मंत्रालयाच्या जवळ आहे, अद्याप येथील या बांधवांना प्रॉपर्टी कार्ड दिले नाही. उरण, नवी मुंबई येथील ५० हजार एकर जमीन शेतकऱ्यांना फसवून घेतली आहे. जेएनपीटी, विमानतळ विकण्याचा घाट म्हणजे हे सरकार देश विकायला निघाले आहे. आता "चाय बेचने वाला अब देश बेच रहा है". कोळी बांधवांना सेनेने फसवले आहे. आता बीजेपी फसवत आहे. देशाला आरोग्य मंदिराची गरज आहे, पण देशाची विचारधारा मंदिरांकडे जात आहे. त्यांच्या व्यवस्थापनांनी कोरोना काळात मदत दिली का ? याचा विचार केला पाहिजे. जेएनपीटी ला कान्होजी आंग्रे यांचे नाव देण्याची मागणी होती. काँग्रेसने जवाहरलाल नेहरू यांचे नाव दिले. मावळातून उभे असणारे श्रीरंग बारणे बारणे यांना कोळी, आगरी समाजाचे प्रश्नांची जाणीव नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक अद्याप का झाले नाही? मागील दहा वर्षात श्रीरंग बारणे उ, पनवेल मध्ये किती वेळ आले? कुळ कायद्याची अंमलबजावणी अध्याप पर्यंत का झाली नाही? ईडब्ल्यूएस योजनेचे निकष बदलण्याची मागणी असताना मागणी का पूर्ण होत नाही? ओएनजीसी प्रकल्पातील कोळी बांधवांचे पुनर्वसन अद्याप का झाले नाही ?  याची उत्तरे दहा वर्षापासून खासदार असणाऱ्या बारणे यांनी दिली पाहिजेत राजाराम पाटील म्हणाले. 

 बीएसपी चे पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड म्हणाले की, कॉंग्रेसच्या काळात सुरू झालेल्या भ्रष्टाचारामुळे देश पोखरून निघाला. काँग्रेस देशाच्या प्रगतीला बाधा आणतो आहे. कॉंग्रेसने 'गरीबी हटाओ' चा नारा दिला आणि गरिबांनाच हटवलं. महागाईने गरीब त्रस्त होऊन पार पिचून गेला. त्यामुळे गरिबांचे रोजचे जीवन सुसह्य करण्यासाठी मतदार बीएसपी च्या मागे उभे राहणार आहे.

   पुणे जिल्हा प्रभारी अशोक गायकवाड यांनी आवाहन केले की, कॉंग्रेसच्या काळात कोळसा, साखर, तांदूळ यांचे  घोटाळे समोर आले. त्याचबरोबर कॉमनवेल्थ गेम्स, 2 G, इत्यादी घोटाळ्यांनी थैमान घातलं. तेव्हा आर्थिक घोटाळ्यांनी मुक्त भारतासाठी हत्ती चिन्हा समोरील बटन दाबून बीएसपी ला विजयी करा.


 तुमची प्रतिक्रिया



 जाहिराती