मुंबई : वॉटर मेट्रो हा प्रकल्प मुंबईच्या वाहतुकीच्या इतिहासात शाश्वत आणि हरित प्रवास ठरेल. जलवाहतुकीच्या माध्यमातून शहरात पर्यावरणपूरक विकासाचा मार्ग खुला होईल, असे मत मान्यवर तज्ज्ञांनी व्यक्त केले.गोरेगाव येथे आयोजित ‘इंडिया मेरीटाईम वीक २०२५’ या कार्यक्रमात आमची मुंबई वॉटर मेट्रो — स्वप्न नव्हे, सत्य या विषयावर झालेल्या परिसंवादात सहभागी मान्यवरतज्ञांनी या प्रकल्पाबद्दल विचार मांडले.या परिसंवादात लोकनाथ बेहरे, व्यवस्थापकीय संचालक, के.एम.आर.एल.,आशिम मॉगीया, एम.डी., एम २ एम फेरी, नकुल विराट, मुख्य व्यावसायिक अधिकारी, कँडेला, अंबर आयदे, मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक, रुरल एनहान्सर ग्रुप आणि सिध्दांत थंडशेरी, सीईओ, नवलट यांनी सहभाग घेतला होता.
“वॉटर मेट्रो” प्रकल्पाच्या माध्यमातून मुंबईतील वाहतुकीस एक नैसर्गिक, प्रदूषणमुक्त आणि विना-अडथळा पर्याय उपलब्ध होईल, असे तज्ञांनी सांगितले. या प्रकल्पामुळे मुंबईतील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी होऊन प्रवाशांना सुखकर, वेळ बचतीचा आणि पर्यावरणपूरक प्रवास करता येईल, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
शासन आणि उद्योग क्षेत्रातील प्रतिनिधींनी प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दिशा, तांत्रिक बाबी आणि भविष्यातील संधींबाबत सखोल चर्चा केली.यावेळी महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य बंदर अधिकारी यांच्या उपस्थितीत एमएमआरडीए क्षेत्रातील “वॉटर मेट्रो” प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले.
जहाज बांधणी, दुरुस्ती व पुनर्वापर धोरणामुळे सागरी उद्योगासाठी नव्या संधी निर्माण होणार
राज्य शासनाने जाहीर केलेल्या जहाज बांधणी, दुरुस्ती व पुनर्वापर धोरणामुळे महाराष्ट्रातील सागरी उद्योगाला नवी दिशा मिळणार आहे. या धोरणामुळे राज्यात गुंतवणुकीच्या संधी वाढणार असून, रोजगारनिर्मितीला देखील चालना मिळेल, असे मत मान्यवरांनी व्यक्त केले.जहाज बांधणी, जहाज दुरुस्ती व जहाज पुनर्वापर धोरण या विषयावर विशेष परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
परिसंवादात उपस्थित मान्यवरांनी जहाज बांधणी व दुरुस्ती क्षेत्रात महाराष्ट्रात असलेल्या नैसर्गिक व तांत्रिक क्षमतेचा उल्लेख करून, या धोरणामुळे राज्य सागरी उद्योगाला नव्या उंचीवर नेण्याची संधी मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.महाराष्ट्र सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी, यांच्या मार्गदर्शनाखाली उ परिसंवादात धोरणाविषयी सविस्तर सादरीकरण करण्यात आले.या परिसंवादात मधु नायर (अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, कोचीन शिपयार्ड), प्रदीप पी. (मु.का.अ. महाराष्ट्र सागरी मंडळ), डान कोट्जे (महाव्यवस्थापक, रॉयल आयएचसी), रुटगर वॅन डॉम (बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर, दमन शिपयार्ड) आणि अर्जुन चौगुले (चौगुले अँड कंपनी) यांनी सहभाग नोंदवला.