मुंबई : ‘वस्त्रहरण’ नाटकाच्या माध्यमातून मालवणी भाषेला मराठी रंगभूमीवर स्वतंत्र ओळख देणारे, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर यांच्या निधनाने मराठी रंगभूमीसह मालवणी नाट्यजगताने प्रतिभावान, संवेदनशील आणि सर्जनशील नाटककार गमावला आहे, अशा शोकभावना व्यक्त करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
उपमुख्यमंत्री पवार आपल्या शोकसंदेशात म्हणतात, ज्येष्ठ नाटककार गंगाराम गवाणकर हे मराठी रंगभूमीवरील प्रादेशिक नाट्यसंस्कृतीचे निष्ठावंत वाहक होते. त्यांनी मालवणी बोलीतील अस्सल जीवन, लोकसंस्कृती, विनोद आणि भावविश्व आपल्या लेखणीतून रंगमंचावर जिवंत केले. ‘वस्त्रहरण’ या नाटकाच्या माध्यमातून त्यांनी मराठी रंगभूमीला नवा आयाम देत प्रादेशिक भाषेतील नाटकांना मुख्य प्रवाहात स्थान मिळवून दिले. त्यांची नाटके ही केवळ मनोरंजन करणारी नव्हती, तर समाजमनाला स्पर्श करणारा आरसा होती. ग्रामीण माणसाच्या जगण्यातील वेदना, विनोद आणि संघर्ष त्यांनी अत्यंत वास्तवतेने मांडल्या. त्यांच्या निधनाने आपण ज्येष्ठ नाटककार गमावला आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी असून गवाणकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे उपमुख्यमंत्री पवार यांनी म्हटले आहे.