मुंबई : राज्यातील महत्वाच्या पर्यटनस्थळी उभारण्यात येणाऱ्या नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्राच्या कामाला प्राध्यान्य देवून ‘नमो पर्यटन कौशल्य’ कार्यक्रम लवकरात लवकर प्रत्येक जिल्हानिहाय सुरू करण्याच्या कामाला गती देण्याचे निर्देश पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीमध्ये पर्यटनमंत्री देसाई बोलत होते. यावेळी पर्यटन विभागाचे प्रधान सचिव डॉ.अतुल पाटणे, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटणे यासह पर्यटन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यातील महत्वाच्या ठिकाणी उभारण्यात येणाऱ्या ‘नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्रा’साठी स्थानिक विविध परवाने घेणे, सर्व तांत्रिक बाबी पडताळून कामाला वेग देण्याचे निर्देश पर्यटन मंत्री देसाई यांनी यावेळी दिले. राज्यातील हजारो युवांना प्रशिक्षण देऊन रोजगार देण्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या नमो सुविधा केंद्र व नमो पर्यटन कौशल्य कार्यक्रमाबाबत सविस्तर चर्चा यावेळी करण्यात आली. राज्यातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देवून ही युवा पिढी पर्यटन विकासाला हातभार लावण्यात महत्वाची भूमिका उत्तमरीत्या बजावू शकेल. यादृष्टिने पावले उचलण्यासंदर्भातही यावेळी चर्चा झाली.
तोरणमाळ, नागांव बीच सारख्या पर्यटनस्थळांच्या शाश्वत विकासासाठी लागण्यारे आवश्यक परवाने आणि ना हरकत प्रमाणपत्रांची पूर्तता करुन सविस्तर प्रस्ताव तयार करुन केंद्र सरकारकडे सादर करण्यासाठी पर्यटन संचलनालयाकडे देण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांना यावेळी देण्यात आले.
