पुणे: महाराष्ट्र शासन मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था आणि मॅप एपिक कम्युनिकेशन प्रा. लि. यांच्या संयुक्त विद्यमाने ‘अंकनाद पाढे सात्मीकरण स्पर्धा पर्व-५’ आणि ‘पर्व-६’ चे पारितोषिक वितरण सोहळा उद्योग मंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला आहे. दि. ६ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २ वाजता केसरी वाडा, पुणे येथे हा कार्यक्रम होणार आहे.मॅप एपिक कम्युनिकेशन प्रा. लि. चे संचालक मंदार नामजोशी यांनी ही माहिती दिली.
शिक्षकांसाठीच्या गणित विषयक व्हीडिओ निर्मिती स्पर्धेचे पारितोषिक वितरण आणि पुणे महानगरपालिका शाळांमध्ये आयोजित केलेल्या पाढे स्पर्धेचे बक्षीस वितरण देखील या कार्यक्रमात होणार आहे. पाढे स्पर्धेसाठी महानगर पालिका शाळा आणि इतर मिळून ३१ हजारहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते. शिक्षकांसाठीच्या गणित विषयक व्हीडिओ निर्मिती स्पर्धेत ११० स्पर्धक सहभागी झाले होते.
या कार्यक्रमात विविध स्पर्धांमधील विजेत्यांचा गौरव करण्यात येईल. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आणि शिक्षकांच्या योगदानाचा सन्मान करण्याचा उद्देश या सोहळ्यामागे आहे.या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.गणिताची भीती दूर करून विद्यार्थ्यांमध्ये गणिताची गोडी निर्माण करण्याचे प्रयत्न ‘अंकनाद' मधून गेली सहा वर्षे केली जात आहेत.