पुणे : शहरातील गुन्हेगारीचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. दिवसाढवळ्या हत्या, हत्येचा प्रयत्न अशा घटना आता नेहमीच्याच झाल्या आहेत. आज पुन्हा एकदा शहराच्या मध्यवर्ती भागात रक्तरंजित थरार उडाला आहे. बाजीराव रोड परिसरात 17 वर्षीय मयंक खराडे या युवकाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली.
विशेष म्हणजे, गेल्या तीन दिवसांत झालेला हा दुसरा खून आहे. दोनच दिवसांपूर्वी गणेश काळे हत्याकांडाने शहर हादरलं होतं, आणि आता पुन्हा एकदा खुनाच्या घटनेने पुणे दणाणलं आहे.घटनेची प्राथमिक माहिती अशी की, आज दुपारी सुमारे 3.15 वाजता मयंक खराडे आणि त्याचा मित्र अभिजीत इंगळे हे दोघं दुचाकीवरून जात असताना महाराणा प्रताप उद्यानाजवळील दखनी मिसळ समोर तीन तरुणांनी त्यांना अडवलं. या तिघांनी तोंडावर मास्क लावलेले होते. त्यांनी मयंकच्या डोक्यात आणि तोंडावर धारदार शस्त्राने वार केले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला असून, नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला असून खुनाचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
गेल्या काही महिन्यांपासून पुण्यात अशा घटनांत चिंताजनक वाढ होताना दिसत आहे.
पोलिसांकडून परिसरातील CCTV फुटेज तपासण्याचं काम सुरू आहे.
आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आलं आहे.
पुणेकरांमध्ये आता वाढत्या गुन्हेगारीमुळे अस्वस्थता आणि भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.