मुंबई : महिलांना स्थानिक जागी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोहा येथे नवतेजस्विनी गारमेंट युनीटचे लोकार्पण करण्यात येत आहे. यामुळे महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल अधिक बळकट होण्यास सहाय्य लाभणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या या नवउद्योगात सहभागी होणाऱ्या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होणार असल्याचा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) निर्मित ‘नवतेजस्विनी गारमेंट युनिट’चे लोकार्पण नुकतेच रोहा (रा.) येथे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, महाव्यवस्थापक महेंद्र गमरे, प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे, माविम अधिकारी, पंचायत समिती सदस्य, उमेद व नगरपरिषद प्रतिनिधी, महिला बचत गटातील सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.
मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, या उपक्रमामुळे रोहा तालुक्यातील महिलांच्या स्वावलंबनाच्या दिशेने एक नवा अध्याय सुरू झाला आहे. महिलांचे प्रशिक्षण, स्थानिक भागातच कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध होणार असल्याने आता महिला आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करीत असल्याचा आनंद आहे.