रायगड : रायगड आणि पुणे जिल्ह्यांना जोडणाऱ्या वरंध घाटात बुधवारी दुपारी एक भीषण अपघात घडला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. मृत तरुणाचे नाव शिवाजी डेरे (रा. शिळींब, ता. भोर) असे असून तो आपल्या मूळ गावी जात असताना ही दुर्घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, शिवाजी डेरे हे मुंबईहून आपल्या शिळींब गावाकडे मोटारसायकलवरून निघाले होते. वरंध घाटातील वळणावर नियंत्रण सुटल्याने त्यांची बाईक साईड पट्टी ओलांडून थेट सुमारे 100 फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आणि जागीच मृत्यू झाला.
अपघाताची माहिती मिळताच महाड एमआयडीसी पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे.या दुर्दैवी अपघातामुळे शिळींब गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. स्थानिकांनी प्रशासनाला वरंध घाटातील धोकादायक वळणांवर सुरक्षा उपाययोजना वाढवण्याची मागणी केली आहे.